“परवानगी मागितली, आता येवल्यात येऊनच उपोषणाला बसतो”; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 11:00 AM2024-07-23T11:00:04+5:302024-07-23T11:01:40+5:30
Manoj Jarange Patil: छगन भुजबळ यांनी मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण केला आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil: ओबीसींमधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी व्हावी, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे ओबीसी आंदोलनाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. यातच शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट आरक्षणाच्या मुद्द्यावर होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता येवल्यात येऊनच उपोषणाला बसतो, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार तसेच भाजपाचे केंद्रातील एनडीए सरकारवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रामधून मराठा जात संपवायची आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच जेव्हा टांगा पटली होईल, तेव्हा आमची गरज कळेल, असा इशारा दिला आहे. त्यांना केवळ सत्ता स्थापन करेपर्यंत गरीबांची गरज होती. सत्ता स्थापन केल्यावर त्यांनी गरीबांवर लाथ मारलीय. आता मोठे मोठे कावळे ओळखीचे झालेत, त्यांना ते धरून आहेत, अशी टीका जरांगे यांनी केली.
आता येवल्यात येऊनच उपोषणाला बसतो
छगन भुजबळ हे तिकडे येवल्यामध्ये बसले आहेत. आता तिकडेच येवल्यामध्ये येऊन उपोषणाला बसतो. छगन भुजबळांनी मराठा समाज आणि धनगर समाजामध्ये वाद लावला आहे. तिकडे येवल्याकडे आंदोलनासाठी परवानगी काढायला सांगितली आहे. तिकडे येवल्यात उपोषणाला येतो आणि मग समजेल की उपोषण काय असते, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
दरम्यान, राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच अमित शाह आमच्या प्रश्नांकडे कशाला लक्ष घालतील? नरेंद्र मोदी हे शिर्डीला आले होते तेव्हा त्यांना आरक्षणाच्या प्रश्नामध्ये लक्ष घाला, असे आवाहन आम्ही केले होते. मात्र त्यांनी लक्ष घातले नाही. ते गरिबाला कधीच मोठं करणार नाहीत. त्यांना देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत. महाराष्ट्रात मराठा मोठी जात आहे. ती त्यांना संपवायची आहे. गुजरातमध्ये पटेल, तसेच यादव, राजपूत, गुर्जर, जाट, मुस्लिम, दलित अशा मोठ्या जाती संपवायच्या आहेत. ते विचित्र लोक आहेत. मोठ्या जाती संपवायच्या आणि छोट्या जातींना धरून राजकारण करायचं हा त्यांचा पणच आहे. मात्र मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल, हे त्यांना माहिती नाही, असे सूचक विधान जरांगे यांनी केले.