मनोजमामा पाणी घ्या, चिमुकल्या काव्याची विनवणी; जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 05:49 AM2024-02-14T05:49:43+5:302024-02-14T05:50:43+5:30
चौथ्या दिवशी जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार
वडीगोद्री (जि. जालना) : उपोषणाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी, १३ फेब्रुवारी रोजीही जरांगे-पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यांनी किमान पाणी तरी प्यावे, यासाठी महिलांसह ग्रामस्थांनीही विनवणी केली. परंतु, जरांगे यांनी नकार दिला. विशेष म्हणजे, उपोषण स्थळाशेजारी राहणारी दीड वर्षीय काव्या या चिमुकलीनेही एक तास जरांगे-पाटील यांच्याजवळ बसून मनोजमामा, पाणी घ्या, अशी विनवणी केली.
जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली
जरांगे-पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मंगळवारी जिल्हास्तरावरील वैद्यकीय पथक अंतरवाली सराटी गावातील उपोषणस्थळी आले होते. परंतु, जरांगे-पाटील यांनी तपासणी करण्यास नकार दिला. आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे-पाटील यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे.
अधिसूचनेच्या अंमलबजावणीशिवाय मी पाणी पिणार नाही. १५ तारखेचे अधिवेशन २० तारखेवर ढकलले. माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहिल का? समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असेल तर शांततेत बंद पाळावा. - मनोज जरांगे-पाटील, मराठा आरक्षण आंदोलन नेते