"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 06:45 PM2024-10-03T18:45:31+5:302024-10-03T19:00:09+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला तर अपक्ष लढू नाहीतर सर्व जागांवर पाडापाडी फिक्स आहे, असं विधान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं होतं. त्यावरून आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे

"Manoj Jarange Patil's should elect candidates instead of playing petty politics", advises Sambhaji Raj Chhatrapati. | "जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला

"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला

मराठा समाजाला सरसकट ओबीसींमधून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मागच्या वर्षभरापासून आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे राज्यातील राजकारणाची बरीच समिकरणं बदलली आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा कुणाला दणका बसेल आणि कुणाला फायदा होईल, याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला तर अपक्ष लढू नाहीतर सर्व जागांवर पाडापाडी फिक्स आहे, असं विधान केलं होतं. त्यावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे. ‘’जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’ असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचा उद्देश आणि माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे त्यांनी पाडण्यापेक्षा उमेदवार निवडून कसे आणता येतील, हे मी त्यांना समजावून सांगितलेलं आहे.  तसेच मी त्यांना विनंती केली आहे की आपण सगळ्यांनी केवळ चळवळ करून भागणार नाही तर सत्तेत येणं आवश्यक आहे. त्यामुळे पाडण्यापेक्षा तुम्ही सत्तेत येणं आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. त्यातील पहिला पर्याय म्हणजे आमच्यासोबत येणं आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही स्वत: लढणं. आता जो काही निर्णय असेल तो ते घेतील. पण सकारात्मक चर्चा झाली आहे, एवढं निश्चित आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. 

यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वाटचालीबाबत माहिती देताना संभाजीराजे म्हणाले की,  महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना काही दिवसांपूर्वी झाली आहे. त्यानंतर सगळीकडे चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पूर्वी स्वराज्य संघटना म्हणून आम्ही पुढे गेले होतो. आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून आम्ही वाटचाल करणार आहोत. स्वराज्य पक्षाचं पहिलंच आंदोलन हे ६ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे. अरबी समुद्रात नियोजित असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, ज्याचं भूमीपूजन देखील झालं होतं. तिथे ते स्मारक आहे की नाही हे पाहण्यासाठीही आमचं हे आंदोलन असणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं औपचारिकपणे उद्धाटन होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

Web Title: "Manoj Jarange Patil's should elect candidates instead of playing petty politics", advises Sambhaji Raj Chhatrapati.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.