खोटे गुन्हे दाखल केले तरी मराठा समाज मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 09:50 PM2023-11-11T21:50:06+5:302023-11-11T21:51:00+5:30
राज्यातले, जालनातील अंतरवाली सराटी इथले गुन्हे मागे घेण्याची भूमिका सरकारची असेल तर विनाकारण आता पुन्हा गुन्हे दाखल का करतायेत? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.
जालना – मराठा मुलांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारने दिले होते. परंतु अद्याप गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यात आणखी काही गुन्हे विनाकारण नोंदवले जातायेत, या केसेसनं आमची पोरं मागे हटणार नाहीत आणि घाबरणारही नाहीत. राज्यभर मराठा पोरांवर खोटे गुन्हे दाखल केले तरी मराठा समाज मागे हटणार नाही. खोट्या गुन्ह्याला घाबरलो तर आमच्या लेकरांचे वाटोळे होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे,
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यानंतर जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात दुसराही अहवाल मांडा. अधिवेशनात कायदा पारित करून मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्रे द्या, मराठा समाज मागे हटणार नाही, रस्त्यावर येऊ, शांततेत आंदोलन करू. २४ तारखेपर्यंत आमची डेडलाईन आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, २४ नंतर पुन्हा अधिवेशन घ्या, कायदा पारित करा असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच बीड, नांदेड, माझलगावच्या पोरांनी सांगितले, आतापर्यंत ३ हजार जणांची चौकशी झालीय, प्रत्येक जण हाणलंय म्हणतोय, आमचे लोक फौजदारी गुन्हे दाखल करू शकतो. आम्ही घाबरणार नाही. आपण आपल्या पक्षाच्या नेत्याला जातीचा प्रश्न मांडा, मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय? अधिवेशनात मराठा समाजाची बाजू मांडायला सांगा, जर कोणत्याही नेत्याच्या फराळाला जाणार असाल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरणार का हे नेत्यांना विचारा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, राज्यातले, जालनातील अंतरवाली सराटी इथले गुन्हे मागे घेण्याची भूमिका सरकारची असेल तर विनाकारण आता पुन्हा गुन्हे दाखल का करतायेत? ओबीसी नेते मिळून मराठा मुलांना टार्गेट केले जातंय. साखळी उपोषण करणाऱ्यांना गुन्हे दाखल करत आहेत. आम्हाला त्रास देऊ नका, जर शांततेत आंदोलन करताना तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देत असाल तर आम्हालाही रस्त्यावर यावे लागेल. आरक्षणापासून आमचे मन विचलित होणार नाही. आरक्षण मिळवणारच यावर ठाम आहे असंही जरांगे पाटील यांनी सांगितले.