“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 04:52 PM2024-10-03T16:52:32+5:302024-10-03T16:53:46+5:30
Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीस यांना हिताचे सांगत आहे. मराठ्यांना डावलू नका. मागण्या मान्य केल्या नाही तर माझ्या नावाने बोंबलायचे नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil News: हा दसरा मेळावा सगळ्यांचा आहे, सगळ्यांनी एकत्र या. कोणीही आडवे पडू नका. राज्यातील मराठ्यांची इच्छा होती की, दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यांसाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटल मधून सुट्टी घेत आहे, कधी दसरा येतो, अशी खूप आशा लागली आहे. कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा आहे, असे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत पुन्हा एकदा थेट शब्दांत इशारा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नवी विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात यायला हवी. महाराष्ट्रात १३ ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असे बोलले जात आहे. याच संदर्भात मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे.
...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल
दसरा मेळावा आणि विधानसभा एकत्र आल्या, त्याला आम्ही काही करू शकत नाही. दसरा मेळावा घ्यायची खूप दिवसाची इच्छा होती. आम्हाला पाडायचे नाही आणि उभेही करायचे नाही, पण बैठक होणार आहे. देवेंद्र फडवणीस आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्याला लोक येणार आहेत. भाजपामधील मराठ्यांनी पण हाच विचार करा आणि फडणवीसांना सांगा. निवडणूक लागण्याअगोदर मराठ्यांच्या मागण्यांचा विचार करा, नाहीतर फडणवीस यांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, लोकसभेच्या अगोदर सांगितले होते की, सरकार निवडणूक घेणार नाही. मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका. नाहीतर माझा नाईलाज आहे. तुम्ही तुमच्या नेत्याला देवेंद्र फडणवीसांना समजावून सांगा. फडणवीस तुम्ही निवडणूक लागण्याआधी आमच्या मागण्या मान्य करा. तुमचे लोक आमच्याकडे येतात. मागण्या मान्य केल्या नाही तर माझ्या नावाने बोंबलायचे नाही. तुम्हाला शब्द आहे, मागण्या मान्य केल्या नाही तर तुमचा सुपडा साफ होईल. देवेंद्र फडणवीस यांना मी हिताचे सांग आहे. मराठ्यांना डावलू नका. जनता, मुस्लीम बांधव, बारा बलुतेदार म्हणतात की, मी मुख्यमंत्री व्हावे. पण, मी स्वार्थी नाही, समाज मोठा आहे. वेळ, मुहूर्त योग्य वेळी घडून येते आणि त्याचा फायदा मराठा, मुसलमान, बारा बलुतेदार यांनी घेतला पाहिजे. दसरा मेळाव्याला ऊन, वारा, पाऊस असला तरी या, असे जरांगे म्हणालेत.