बीड: 'अशा वेळेला ते एकनाथ शिंदेच पाहिजे होते', मनोज जरांगेंचं मुख्यमंत्रि‍पदाबद्दल मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:44 IST2025-02-25T16:40:54+5:302025-02-25T16:44:26+5:30

Manoj Jarange Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी असमाधान व्यक्त केले. त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते, अशी भूमिका मांडली.  

manoj jarange said that eknath Shinde was better chief minister | बीड: 'अशा वेळेला ते एकनाथ शिंदेच पाहिजे होते', मनोज जरांगेंचं मुख्यमंत्रि‍पदाबद्दल मोठं विधान

बीड: 'अशा वेळेला ते एकनाथ शिंदेच पाहिजे होते', मनोज जरांगेंचं मुख्यमंत्रि‍पदाबद्दल मोठं विधान

Manoj Jarange on Eknath Shinde Devendra fadnavis: "सरकार आपल्यासोबत असून आपल्याला न्याय नाही म्हटल्यावर... सोबत नसतं तर ठीक आहे की, आंदोलन करावं लागेल. पण, यापेक्षा कोणते संवेदनशील प्रकरण हवंय सरकारला? अशा वेळेला ते शिंदे साहेबच पाहिजे होते", असे मोठे विधान मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी मस्साजोग येथे केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मस्साजोग येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. 

एकनाथ शिंदेंबद्दल बोलताना फडणवीसांवर निशाणा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. "अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे होते. त्यांनी खपाखप तुरुंगात टाकले असते. तंगड्या धरून आपटले असते. ही काय तिरस्कारासारखी वागणूक आहे. देशमुख कुटुंबाला उपोषणाला बसावं लागतंय म्हणजे तिरस्काराची वागणूक आहे."

"मुख्यमंत्र्यांना देशमुख कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला की नाही? आजही देताहेत. तुम्हाला एकदाही माया दया फुटत नाही. सरकारसोबत असून न्याय नाहीये", असे मनोज जरांगे म्हणाले. 

एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, जरांगेंनी काय दिले उत्तर?

तुम्ही म्हणालात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते, तर तुरुंगात टाकलं असतं. पण, ते सरकारमध्ये आहेत? असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला. 

या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, "अरे बाबा, मुख्यमंत्री होते, तेव्हाच चालू दिलं नाही, आता उपमुख्यमंत्र्याचं केव्हा चालू द्यायचं. तेव्हा कामं झाली नाहीत. आमच्या दोन मागण्यांना आता दोन महिने होतील. मराठा आरक्षणाच्या. आठ मागण्या होत्या. म्हणाले, चार करतो. चारपैकी आता दोन वर आलेत. त्याही पूर्ण होईना. कुणाचाच कुणाला मेळ नाही. यातून लक्षात येतं की, गरिबांचा सरकारला किती तिरस्कार आहे", असे उत्तर मनोज जरांगेंनी दिले. 

एकनाथ शिंदे भेटीला आले नाहीत?

देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला एकनाथ शिंदे आले नाहीत, असा प्रश्नही जरांगेंना विचारण्यात आला. ते म्हणाले, "ते आले. नाही आले. तो त्यांचा विषय आहे. ते मला माहिती नाही. बाकीचे कुणीच येऊन गेले नाहीत, त्यांचं काय? फडणवीस पण आले नाहीत. देशमुख कुटुंबीयांनी काय हेलिकॉप्टर लावायचं होतं का? इकडे काय मुसळधार पाऊस होता, इकडचे सगळे पूल वाहून गेले होते? मी बरोबरी करत नाही, मी फरक सांगतोय. फडणवीसांचा द्वेष किंवा शिंदे लय चांगले, असं नाही. आम्ही दोघांच्या कामातील फरक सांगतोय", असे मनोज जरांगे म्हणाले.

Web Title: manoj jarange said that eknath Shinde was better chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.