"मनोज जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी", शंभूराज देसाई यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 09:02 PM2024-07-20T21:02:42+5:302024-07-20T21:04:49+5:30

Shambhuraj Desai : मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणावर राज्य उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे.

"Manoj Jarange should take a conciliatory stance", appeals Shambhuraj Desai | "मनोज जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी", शंभूराज देसाई यांचं आवाहन

"मनोज जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी", शंभूराज देसाई यांचं आवाहन

मुंबई : सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र, सरकारला त्यांच्या मागण्या पूर्ण करत आलेल्या नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. आजपासून त्यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणावर आता राज्य उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे. शनिवारी शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात आज टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

आंदोलन दरम्यान जे गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी एक समिती गठीत केली आहे. त्यामध्ये दोन लाखाच्या वर असणारे गुन्हे मागे घेता येत नाहीत. त्याबाबत ही कार्यवाही सुरू आहे. अधिवेशनामध्ये व्यस्त असल्यामुळे हे राहून गेलं आहे. तरीपण आम्ही कार्यरत आहोत, सरकार आपल्या मागण्यांच्या पासून बिलकुल मागे गेलेले नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी समंजस्याची भूमिका घ्यावी. सरकार बिलकुल चाल ढकल करत नाही. जरांगे पाटील यांनी कोणताही आंदोलनाचा मार्ग निवडू नये. आरक्षणाचा लाभ घेताना कोणत्याही एका प्रवर्गातून मिळतो. जे आपण धोरण ठेवले आहे, त्या धोरणाच्या बाहेर सरकार जाणार नाही, असे शंभूराज देसाई म्हणाले.

गेल्या महिन्यात मनोज जरांगे यांनी जे उपोषण केलं. तेव्हा मी त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी तीन मागण्या मांडल्या होत्या. त्यात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांचे वाटप आणि मराठा आंदोलकांवरील केस मागे घेण्याच्या मागणीचा समावेश होता. त्यांची भेट घेतल्यानंतर मी स्वत: संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तसंच सगेसोयऱ्यांच्या ड्राफ्टबाबत माहिती घेतली. त्याचं काम आजही सुरू आहे, हैदराबाद गॅझेटबाबत तेलंगणा सरकारकडे आम्ही कागद पत्रांची मागणी केली आहे. तसंच गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू आहे, त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मागण्यावर सरकार काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

याचबरोबर, मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत आठ लाखाचं ज्या पालकांचे उत्पन्न आहे. त्यांना मोफत शिक्षणाचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये साडेतीनशेहून अधिक कोर्सेस आहेत, यामध्ये पावणे दोन हजार कोटी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पामध्ये केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना काही स्पष्टता हवी असेल तर त्या जीआरनुसार करून दिली जाईल, असं शंभुराज देसाई म्हणाले. तसंच, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती. याबाबतही शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं. लाडका भाऊ, लाडकी बहीण या योजनांबाबत मनोज जरांगे पाटील यांनी टीका करू नये. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढा उभा करता आहेत. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. सरकार एवढं अनेक योजनांमधून चांगलं निर्णय घेतंय. सरकारने केवळ घोषणा केलेल्या नाहीत, त्यांची अंमलबजावणी देखील सुरु केली आहे, असं शंभुराज देसाई म्हणाले.

Web Title: "Manoj Jarange should take a conciliatory stance", appeals Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.