“राज ठाकरेंना नाही, गरिबांना आरक्षणाची गरज, एसीत बसणाऱ्यांना किंमत कळणार नाही”: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 01:23 PM2024-08-11T13:23:17+5:302024-08-11T13:25:13+5:30
Manoj Jarange Patil Replied Raj Thackeray: विधानसभेला कोणते ११३ आमदार पाडणार हे लवकरच सांगणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil Replied Raj Thackeray: राज ठाकरे यांना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आरक्षणाची गरज आहे. राज ठाकरे यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मराठे आणि गोरगरीब जनतेच्या जिवावर त्यांना हे सगळे वैभव मिळाले आहे. श्रीमंत आणि एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत कळणार नाही. विद्यार्थांना विचारा की आरक्षणाची गरज आहे का, ते नाही म्हणाले तर तुमचे मत व्यक्त करा. प्रत्येक वेळेस तुमचे विचार जनतेवर लादून चालत नाही आणि ते तुम्ही लादूही नका, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
खरे तर जातीपातीचा विचार न करता गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे. राज ठाकरे मराठा आरक्षणाविरोधात आहे, अशा बातम्या पेरल्या गेल्या. मनोज जरांगे यांच्या आडून पवार आणि उद्धव हे राजकारण करत आहेत, असे सांगत माझ्या नादी लागू नका, असा इशारा राज ठाकरे यांना दिला होता. यानंतर आता मीडियाशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना उत्तर दिले.
मराठा समाजाकडून राज्यात कोणताही आंदोलन सुरू नाही
राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणारे बघितले नाही. गाड्या फोडणाऱ्यांच्या विचारांना थोडेच राज्य चालते. मराठा समाजात ताकद आहे. पण मराठा समाजाकडून राज्यात कोणताही आंदोलन सुरू नाही. विनाकारण कोणी फडणवीसांसारखे सुपारी घेतल्यासारखे आंदोलन करणे, यात्रा काढणे बंद करा. आम्ही मुंबईला जाऊन जाब विचारू शकतो, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आरक्षण देणार नसतील तर आम्हाला भूमिका घ्यावी लागेल. मला माझा समाज आणि समाजाची मुलं मोठी करायची आहेत. आरक्षण देणार नसतील तर पु्न्हा मुंबईला जाऊ. विधानसभेला कोणते ११३ आमदार पाडणार हे आत्ताच सांगणार नाही. पण लवकरच कोण आहेत ते सांगणार. पण नवीन येणारे ११३ आमदार आमचे असतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.