...तर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील; संतोष देशमुख प्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:42 IST2025-04-01T18:42:09+5:302025-04-01T18:42:54+5:30
Manoj Jarange Patil : बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड आणि बबन गित्ते गँगमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

...तर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील; संतोष देशमुख प्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh Case: बीडच्या कारागृहात संतोष देशमुख प्रकरणाचा आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर हल्ला झाल्याची दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. काल सकाळच्या सुमारास कराड आणि बबन गित्ते गँगचा महादेव गिते एकमेकांना भिडल्याची माहिती आहे. या प्रकरणावर आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी गँगवॉरमध्ये एकमेकांनाच संपवतील, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले आणि अन्य आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. याशिवाय, आरोपी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून लवकरात लवकर आरोपींना फाशी द्या. जिल्हा प्रशासनातील सर्वांची बदली करून तिथे नवीन स्टाफ भरायला पाहिजे. त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
गृहमंत्री आरोपींना वाचवत आहेत...
नुकताच बीड जिल्ह्यातील कळंब शहरातील एका घरात महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या महिलेचा संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध असल्याचा दावाही करण्यात आला. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, गृहमंत्री जाणून-बुजून हे टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील कोण आरोपी आहेत? कोण पोलीस आहेत? आरोपींना फरार असताना पैसे पुरवणारे कोण आहेत? या सर्वांना सह आरोपी करा. पण ते करत नाही, कारण गृहमंत्र्यांनाच आरोपींना वाचवायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.