तुम्ही जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुके हाती घ्यावे लागतील -मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 16:39 IST2024-12-28T16:37:14+5:302024-12-28T16:39:18+5:30

बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला. 

Manoj Jarange warns Cm Fadnavis that If you are going to feed the communal minister, we will have to take up the baton | तुम्ही जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुके हाती घ्यावे लागतील -मनोज जरांगे

तुम्ही जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुके हाती घ्यावे लागतील -मनोज जरांगे

Manoj Jarange Santosh Deshmukh News: "संतोष देशमुख यांच्या आरोपींना तातडीने अटक करा. ज्यांनी आरोपींना पळवून लावलं. त्या नेते, मंत्र्यांनाही अटक करा. तुम्ही जातीयवाद मंत्र्यांना पोसणार असाल, तर आम्हाला दंडुके हातात घ्यावे लागतील", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला दिला. 

बीडमध्ये बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, प्रत्येक वेळी आंदोलन करण्याची गरज नाही. विरोधी आणि सत्ताधारी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी आणि ज्यांची ज्यांची नावे घेतली गेली आहेत, त्यांना अटक करा असे सांगावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

त्या लेकराचा सोन्यासारखा बाप गेला - मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं. ज्याची नावे घेतली त्या सगळ्यांना अटक करा म्हणून सांगा. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला धक्का सुद्धा लागू देणार नाही. संतोष भाऊंच्या लेकीकडे बघा. त्या लेकराला घरात बाप दिसत नाही. तिला दुःख आलं तर तिच्या पाठीवरून कोणी हात फिरवायचा? तिच्या तोंडावरून हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला. तुमची आमची भाषणे होत राहतील, पण तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभं राहावं लागेल", असे आवाहन जरांगेंनी केली.  

मनोज जरांगे म्हणाले, "आता जशास तसे उत्तर द्यायचे"

"राज्यभर हे लोण आंदोलनाचे पसरले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा. कुणी मागे सरकायचं नाही. आणखी एक सल्ला धाडसी बना. हे आणखी हल्ले करू शकतात. आता वाट बघायची नाही. कोणीही आपल्यावर हल्ला केला की, जशास तसे उत्तर द्यायचे", असे मनोज जरांगे म्हणाले. 

"तुमचा नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्षातील नेते आमचे सासरे नाहीत. आमच्या आईच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले. पुढच्या काळात सावध रहा. सरकार आलंय. सरकार गोरगरिबांना न्याय देणार की नाही. संतोष देशमुखांची हत्या झाली. परभणीचे प्रकरण झाले", असे जरांगे यांनी यावेळी सांगितले. 

आम्हालाही दंडुके घ्यावे लागतील -मनोज जरांगे

"तुम्ही जातीयवादी मंत्री जर पोसणार असलात, तर आम्हाला दंडुके हातात घ्यावे लागतील. मराठ्यांना संपवायला निघालेत. जातीयवादी मंत्री तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे चिलटं तुम्हाला धरता येत नाहीत. मग अवघड आहे. आम्ही खवळलो, तर आम्हाला नाव ठेवू नका", असा इशारा मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला दिला. 

"या राज्यात सरकार पक्षाला किंवा काही जातीयवादी मंत्र्यांना विध्वंस घडवून आणायचा असला, तरी आम्हाला घडवू द्यायचा नाही, हे प्रामाणिकपणे सांगतो. तुम्ही सगळ्यांनी (सर्व पक्षीय आमदार) मुख्यमंत्र्यांकडे जावं. त्या आरोपींना पकडण्यासंदर्भात बोलावं आणि कुटुंबीयांना घरी येऊन सांगावं की, आम्ही दोन-तीन दिवसांत सगळ्यांना पकडणार आहोत. ज्या नेत्याने, आमदाराने त्यांना पळवून लावलं आहे, त्याचेही कुटुंब आत टाका म्हणजे तो पळून गेलेला घरी येईल. एखाद्या मंत्र्याला अटक करण्यासाठी राज्यपालांची परवानगी लागते. राज्यपाल तुमचाच आहे", असे म्हणत मनोज जरांगेंनी मंत्र्यालाही अटक करण्याची मागणी केली. 

Web Title: Manoj Jarange warns Cm Fadnavis that If you are going to feed the communal minister, we will have to take up the baton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.