मनोज जरांगे यांचे मुंबईकडे प्रस्थान; आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 05:29 AM2024-02-26T05:29:31+5:302024-02-26T05:30:20+5:30
थांबविण्यासाठी मराठा समाज बांधवांची कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/वडीगोद्री : सलाईनमधून विषप्रयोग करणे, एन्काउंटर करण्यासह इतर मार्गांनी मला संपविण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप करत मनोज जरांगे-पाटील यांनी बैठकीतूनच मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली. जरांगे यांनी उपचार घ्यावेत आणि नंतर मुंबईकडे जावे, यासाठी त्यांची मनधरणी करताना समाजबांधवांना मोठी कसरत करावी लागली.
जरांगे यांनी रविवारी अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक बोलाविली होती. बैठकीत ते म्हणाले, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी समाजाचा आहे. माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पाठबळामुळे काही जण समोर येऊन आरोप करीत आहेत. उपोषणात मरू द्यावे, सलाईनमधून विष द्यावे, एन्काउंटर करावे, ४२० दाखल करून जेलमध्ये घालावे, असे फडणवीस यांना वाटते, असा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला.
...अन् जरांगे निघाले!
काहींना पुढे करून पैसा पुरविला जात आहे. आजवर एकाही महिलेची तक्रार माझ्या विरोधात नाही. परंतु, गंभीर आरोप केले जात आहेत, असे जरांगे म्हणाले.
माझा बळी घ्यायचा आहे तर मी सागर बंगल्यावर येतो. एक तर माझा बळी देतो किंवा सगेसोयऱ्यांचा कायदा घेऊन येतो, असे म्हणत जरांगे यांनी बैठकीतूनच फडणवीस यांच्या बंगल्याकडे प्रस्थान केले. समाजबांधवांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते कोणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
असा झाला प्रवास
दुपारी १ वा. : बैठक सुरु,
मनोज जरांगे-पाटील हे मुंबईतील सागर बंगल्यावर जात आहेत. ते अंतरवाली सराटीतून निघाले असून, समाज बांधवाच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले आहेत. तेथून पैठण, बिडकीन, गंगापूर, येवला, नाशिक, ठाणे आणि मुंबई येथील सागर बंगल्यावर जरांगे पाटील जाणार आहेत.
जरांगे यांना आली भोवळ, भांबेरीत चार तासांचा थांबा
मुंबईकडे जाण्यासाठी जरांगे-पाटील भांबेरी मार्गे निघाले. परंतु, १६ दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी मुंबईकडे जाऊ नये, यासाठी समाजबांधव विनवणी करीत होते. काहींनी रस्त्यावर झोपून त्यांना थांबविण्याचा प्रयल केला. परंतु, जरांगे ठाम होते. काही अंतर गेल्यानंतर त्यांना भोवळ आली. त्यानंतर एका वाहनात बसून ते मुंबईकडे निघाले.
या मार्गे जाणार जरांगे-पाटील मुंबईला
भांबेरी गावात जरांगे यांना समाजबांधव, महिलांनी थांबविले. नारायण गडचे महंत शिवाजी महाराज यांनी समाजाच्या विनंतीनुसार जरांगे यांनी जेवण करावे, असा आग्रह केला. त्यानुसार जरांगे यांनी भांबेरी येथे थांबण्यास सहमती दिली. परंतु, उपोषण सोडणार नसल्याचे सांगत चार तास थांबण्यासाठी तयारी दर्शविली.