भाजपाकडून मनोज कोटक यांचा अर्ज
By admin | Published: December 9, 2015 01:09 AM2015-12-09T01:09:55+5:302015-12-09T01:09:55+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मुंबईतून भाजपा कडून मनोज कोटक यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मुंबईतून भाजपा कडून मनोज कोटक यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार, मुंबई भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील दोन जागांपैकी संख्याबळाच्या आधारावर शिवसेनेचा विजय निश्चित आहे. या जागेवर शिवसेनेचे रामदास कदम मैदानात असून, त्यांना विजयासाठी पहिल्या पसंतीची ७५ मते आवश्यक असून, शिवसेनेकडे तेवढे संख्याबळ आहे. दुसऱ्या जागेकरिता भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत होणार आहे. भाजपाकडून मनोज कोटक, तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार भाई जगताप आमनेसामने आहेत. भाजपाकडे अवघे ३२ चे संख्याबळ असून विजयाचे कोडे सोडविण्यासाठी २८ मते असणाऱ्या मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेच्या पाठिंबा दिला तरी भाजपाला आणखी १५ मतांची गरज भासणार आहे, तर भाई जगतापांकडे काँग्रेस (५३), राष्ट्रवादी (१४) असे ६७ संख्याबळ होते. जगताप यांना आठ मते कमी पडत आहेत. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले की, शिवसेना-भाजपा उमेदवाराचा विजय निश्चित आहे. विजयासाठी सर्वांची मदत घेणार असून, सर्व नेत्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)