मनोरुग्ण मुलीचा पित्यावर बलात्काराचा खोटा आरोप
By admin | Published: June 3, 2017 03:16 AM2017-06-03T03:16:00+5:302017-06-03T03:16:00+5:30
वडील फक्त लहान भावावर प्रेम करतात, आपले लाडच करत नाहीत, अशा समजुतीतून एका १३ वर्षांच्या मनोरुग्ण मुलीने पित्यावरच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडील फक्त लहान भावावर प्रेम करतात, आपले लाडच करत नाहीत, अशा समजुतीतून एका १३ वर्षांच्या मनोरुग्ण मुलीने पित्यावरच लैंगिक अत्याचाराचा खोटा आरोप केल्याची धक्कादायक घटना ओशिवरा येथे घडली. पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात वडिलांना अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
जोगेश्वरीत १३ वर्षांची नेहा (नावात बदल) चहाची टपरी चालविणारे वडील, आई आणि दोन भावंडासह राहते. दोन दिवसांपूर्वी नेहा अचानक घरातून गायब झाली. बराच शोध घेऊनही न सापडल्याने, वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर, सांताक्रुझ येथील चौपाटीवर ती वडिलांना सापडली. मुलगी सापडल्याची माहिती देण्यासाठी ते मुलीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी नेहाची विचारपूस केली असता, तिने वडिलांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे घर सोडून निघून गेल्याचे सांगितले.
नेहाच्या तक्रारीवरून पोलिसांनी वडिलांविरुद्ध पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आणि तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणीनंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदविण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलीसही चक्रावले. ‘बाबा माझ्या लहान भावाचे लाड करतात, माझे करतच नाहीत, म्हणून रागाने मी हा आरोप केला,’ असे तिने पोलिसांना सांगितले.
तक्रारदार मुलगी आणि तिची आई मनोरुग्ण असून वडील दोघांचाही सांभाळ करतात. यापूर्वीही दोन ते तिनदा मुलगी घरातून निघून गेली होती. तेव्हाही पोलिसांनी तिला सांताक्रुझ चौपाटीवरून शोधून आणले होते. मी घरी परतत असताना, दोन मुलांनी मला अडविले आणि माझ्यावर अत्याचार केला, असा आरोप तिने तेव्हाही केला होता. मात्र वैद्यकीय चाचणीत असा काहीच प्रकार घडला नसल्याचे उघडकीस आले होते.
सध्या तिला डोंगरी सुधारगृहात पाठविण्यात आले असून तिचे समुपदेशन करण्यात येणार आहे, अशी माहिती ओशिवराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने तिच्या वडिलांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.