मुंबईत मुसळधार, पुणेकरही सुखावले; कोकणात पावसाचा रेड अलर्ट कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 06:38 AM2022-07-08T06:38:30+5:302022-07-08T06:38:52+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याने प्रशासनाकडून संबंधितांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई : मुंबईसह कोकणकिनारपट्टीला गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. घाटमाथा तसेच पुणे शहर आणि परिसरातही संततधार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप होती. विदर्भात नागपूर वगळता अन्यत्र जोरदार पाऊस झाला नाही. मराठवाड्यातही पावसाचा जोर नव्हता. पुढील तीन दिवस मुंबई कोकणासह मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट कायम आहे.
मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने लोकलसह रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर चांगलाच मंदावला होता. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच होती.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याने प्रशासनाकडून संबंधितांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
देशात काय स्थिती?
देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जम्मू आणि काश्मीरपासून मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाेरदार पाऊस सुरू आहे. ढगफुटी, भूस्खलन, अतिवृष्टी आणि महापुराने दिवसभरात विविध राज्यांमध्ये सुमारे २० जणांचा मृत्यू झाला आहे.
९ जुलै : रेड अलर्ट
१० जुलै : ऑरेंज अलर्ट - मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर
८-११ जुलै : सोसाट्याचा वारा - कोकण आणि गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहेल.