उद्यापासून राज्यात पुन्हा कोसळधारा; कोकणपट्ट्याला ऑरेंज अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:31 AM2022-07-04T07:31:36+5:302022-07-04T07:32:19+5:30
येत्या २४ तासांत ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्यांची वायव्येकडे होणाऱ्या वाटचालीमुळे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही माॅन्सूनच्या शाखा सक्रिय चांगल्याच होतील
मुंबई : शहर आणि उपनगरांत कोसळणाऱ्या पावसाने शनिवार-रविवार सुटी घेतली असली तरी मंगळवार, ५ जुलैपासून मुंबईसह राज्यभरात कोसळधारांचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेषत: ४ ते ७ जुलै यादरम्यान संपूर्ण कोकणपट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने पर्जन्यमान सुधारणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी येत्या दिवसात पावसाच्या एकूण स्थितीबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, येत्या २४ तासांत ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्यांची वायव्येकडे होणाऱ्या वाटचालीमुळे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही माॅन्सूनच्या शाखा सक्रिय चांगल्याच होतील. त्यामुळे राज्यात ५ जुलैपासून पुढील चार ते पाच दिवसांत चांगला पाऊस अपेक्षित असल्याचे होसाळीकर म्हणाले.
काय आहे इशारा ?
उत्तर कोकण : मुंबई, ठाणे, पालघर व रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
दक्षिण कोकण : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.
उत्तर मध्य महाराष्ट्र : पुणे आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र : सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील.