मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारण्यात फुंडकर अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:22 AM2017-07-30T00:22:59+5:302017-07-30T00:22:59+5:30

महाराष्ट्रातील नवीन सरकारातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद सोडता सर्वच मंत्री हे मंत्रिमंडळाच्या बैठकीस शतप्रतिशत उपस्थित राहिले नसून, कृषिमंत्री

mantaraimandala-baaithakailaa-daandai-maaranayaata-phaundakara-avavala | मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारण्यात फुंडकर अव्वल

मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारण्यात फुंडकर अव्वल

Next

मुंबई : महाराष्ट्रातील नवीन सरकारातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद सोडता सर्वच मंत्री हे मंत्रिमंडळाच्या बैठकीस शतप्रतिशत उपस्थित राहिले नसून, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर दांडी मारण्यात अव्वल असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्य सचिव कार्यालयाने दिली आहे. पाच टॉप दांडीबहाद्दर मंत्र्यांमध्ये फुंडकर, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, संभाजी निलंगेकर-पाटील, राजकुमार बडोले यांचा क्रमांक लागतो.
अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळाच्या बैठका आणि मंत्र्यांच्या उपस्थितीची माहिती मागितली होती. मुख्य सचिव कार्यालयाचे अवर सचिव आणि जन माहिती अधिकारी केळकर यांनी गलगली यांस कळविले की, १७ जुलै २०१६ पासून २२ मे २०१७ या कालावधीत मंत्रिमंडळाच्या ३५ बैठका झाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता सर्व २२ मंत्र्यांनी कधी ना कधी दांडी मारल्याचे समोर आले आहे. फुंडकर हे ३५ पैकी ११ वेळा अनुपस्थित होते. वित्तमंत्री मुनगंटीवार आणि ऊर्जामंत्री बावनकुळे या दोघांनीही ९ वेळा अनुपस्थित राहून दुसरा क्रमांक पटकावला. पंकजा मुंडे, राजकुमार बडोले आणि संभाजी निलंगेकर-पाटील हे तिघे प्रत्येकी ८ वेळा अनुपस्थित होते. ग्राहक सरंक्षणमंत्री गिरीश बापट आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता हे दोघे ७ वेळा अनुपस्थित होते. जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री राम शिंदे आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम हे ६ वेळा अनुपस्थित होते.

यांचीही अनुपस्थिती
सहकारमंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबन लोणीकर हे ५ वेळा अनुपस्थित होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे प्रत्येकी ४ वेळा तर पर्यटनमंत्री जयकुमार रावळ ३ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन २ वेळा अनुपस्थित होते. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर एकदा अनुपस्थित होते.

Web Title: mantaraimandala-baaithakailaa-daandai-maaranayaata-phaundakara-avavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.