मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या नाहीतर मंत्रालय बॉम्बनं उडवू; अज्ञाताकडून धमकीचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 09:26 PM2023-08-31T21:26:12+5:302023-08-31T21:26:50+5:30
बॉम्ब मंत्रालयात फोडू असा निनावी फोन आला अन् सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली.
Mantralay bomb threat Call । मुंबई : बॉम्ब मंत्रालयात फोडू असा निनावी फोन आला अन् सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आल्याने एकच खळबळ माजली. एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून सांगितल्यानंतर मंत्रालयामध्ये पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. लक्षणीय बाब म्हणजे निनावी फोन करणाऱ्यानं मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून न दिल्यास बॅाम्बनं मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली.
धमकी देणारा फोन आल्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली. हा फोन अहमदनगरमधून आला असल्याचे कळते. या व्यक्तीला काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ न शकल्याने त्यानं त्रस्त होऊन ही धमकी दिली. मागील १५ दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालयात बॉम्ब फोडू अशी धमकी दिली आहे.
धमकीचा फोन करणारा अहमदनगरचा
दरम्यान, मागील १५ दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं न झाल्यानं संतप्त होऊन अज्ञातानं धमकीचा फोन केला. मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन दिलं नाही तर मंत्रालयात बॅाम्ब ठेवून उडवून देऊ, अशी धमकी निनावी कॉल करणाऱ्या व्यक्तीनं दिली. तसेच संबंधित धमकी देणाऱ्यानं मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली.
दुसरीकडे मुंबई मेट्रो येथे काम सुरू असताना दगड फोडण्यासाठी करण्यात आलेल्या स्फोटकाचा फटका मंत्रालयाला सुद्धा बसला आहे. मुंबई मेट्रोचे काम सुरू असताना काही दगडांमुळे मंत्रालयाच्या कार्यालयाच्या काचा फुटल्या. त्या कामामुळे मंत्रालयाच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.