मंत्रालयात खंडणीखोर व्हायरस !
By admin | Published: May 26, 2016 04:26 AM2016-05-26T04:26:05+5:302016-05-26T04:26:05+5:30
जगभरात खंडणीखोरीसाठी कुख्यात असणाऱ्या लॉकी रॅन्समवेअर व्हायरसमुळे मंत्रालयातील सुमारे दीडशे संगणक निकामी झाले असून सगळी नेटवर्किंग सिस्टीम बंद पडली आहे.या व्हायरस
मुंबई : जगभरात खंडणीखोरीसाठी कुख्यात असणाऱ्या लॉकी रॅन्समवेअर व्हायरसमुळे मंत्रालयातील सुमारे दीडशे संगणक निकामी झाले असून सगळी नेटवर्किंग सिस्टीम बंद पडली आहे.या व्हायरस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना केवळ सरकारी
ई-मेल आयडी वापरण्याचे निर्देश
देण्यात आले असून जीमेल, याहू
यासारख्या खासगी कंपन्यांचे ई-मेल आयडी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
गेल्या शुक्रवारी सर्वप्रथम या व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आला. मंत्रालयातील संगणकांत सेव्ह केलेल्या फाइल उघडता येत नसल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली. प्रामुख्याने आॅफिस डॉक्युमेंट, पीपीटी फाइल ओपन होत नव्हत्या. प्रामुख्याने महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंधित संगणकांना या लॉकी व्हायरसची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यानंतर
आयटी विभागाने तत्काळ व्हायरस रोखण्याची कार्यवाही सुरू केली. मंत्रालयात सुमारे ५ हजार ३०० संगणक असून त्यापैकी व्हायरस शिरलेले संगणक शोधून ते वेगळे करण्यात आले. व्हायरस शिरलेले सुमारे १५० संगणक मंत्रालयाच्या मुख्य ‘लोकल एरिया कनेक्शन’ (लॅन) पासून वेगळे करण्यात आले. त्यानंतर खबरदारीचे उपाय म्हणून संगणकांमध्ये अँटी व्हायरस, सेफ्टी फायरवॉल उभारण्यात आले.
लॉकी व्हायरस जगभर खंडणीखोरीसाठी कुख्यात आहे. स्पॅम मेल, पेन ड्राइव्हसारख्या पोर्टेबल डिव्हाइसच्या माध्यमातून तो संगणकात पोहोचविला जातो. एकदा हा व्हायरस संगणकात शिरला की तो त्या संगणकातील फाइल्स लॉक करून टाकतो. पासवर्डशिवाय हा लॉक उघडता येत नाही. त्यामुळे आपल्याच फाइल्स आपणास उघडणे अशक्य बनते. त्यानंतर संबंधित हॅकर्स या फाइल उघडण्यासाठी पासवर्डच्या बदल्यात खंडणीची मागणी करतात. सायबर विश्वातील अत्यंत महागड्या बिट्कॉईन या सायबर चलनातून ही खंडणी भरावी लागते. अमेरिका, जर्मनी आदी देशातील अनेक कंपन्यांना या लॉकीचा फटका बसला आहे. मोठी आर्थिक उलाढाल असणा-या कंपन्या, हॉस्पिटल्स्, शाळा-महाविद्यालये, संस्थांना लक्ष्य करण्यात येते. माहितीच्या बदल्यात खंडणी उकळली जाते.
मंत्रालयीन कामकाजाशी संबंधित सर्व फाईल्स् राज्याच्या ‘डाटा सेंटर’मध्ये सेव्ह केली जातात. त्यामुळे लॉकी व्हायरसचा विशेष फटका बसला नाही. व्हायरस शिरलेल्या दिडशे संगणकाच्या हार्डडिस्कवर ज्या फाईल्स् होत्या त्या मात्र लॉकी व्हायरसमुळे बाधित झाल्याचे आयटी विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांनी सांगितले.
खबरदारीचे उपाय
एकीकडे सरकार ‘डिजिटल इंडिया’चा डंका पिटत असताना व्हायरसच्या हल्ल्यात सरकारचीच यंत्रणा ठप्प झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी सरकारला खबरदारीचे उपाय योजावे लागतील, असे संगणक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.