पुन्हा मनुस्मृती, बंदी असतानाही नव्या रूपात प्रकाशन
By Admin | Published: March 9, 2016 02:31 PM2016-03-09T14:31:00+5:302016-03-09T15:47:59+5:30
महाराष्ट्र राज्याने तब्बल दहा वर्षापूर्वी प्रकाशन व विक्रीस बंदी घातलेल्या मनुस्मृतीचे नव्या स्वरूपात प्रकाशन करण्यात आले असून राज्यभरातील पुस्तकालयांमधून विक्रीही सुरू करण्यात आली आहे.
राहुल अवसरे,
नागपूर, दि. ९ - महाराष्ट्र राज्याने तब्बल दहा वर्षापूर्वी प्रकाशन व विक्रीस बंदी घातलेल्या मनुस्मृतीचे नव्या स्वरूपात प्रकाशन करण्यात आले आहे. मूळ संस्कृत भाषेत असलेल्या या ग्रंथाचे संपूर्ण मराठीत भाषांतर करण्यात आले असून राज्यभरातील पुस्तकालयांमधून विक्रीही सुरू करण्यात आली आहे.
दलित, पीडित आणि शोषितांना, विशेषत: महिलांना गुलाम बनविण्याचे धडे देणा:या या ग्रंथाविरुद्ध पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणावर जनमानस पेटून उठून 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ग्रंथाचे जाहीरपणो दहन केले होते. पुढे पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणा:या महाराष्ट्र राज्याने दहा वर्षापूर्वी या ग्रंथाच्या प्रकाशन व विक्रीवर बंदी घातली होती. परंतु बंदी आदेशाची अंमलबजावणीच करण्यात आली नव्हती.
प्रत्यक्षरीत्या हा ग्रंथ नेमका कोणी आणि कोणत्या कालखंडात लिहिला याचा अद्यापही शास्त्रोक्त शोध लागलेला नाही. ब्रह्मदेवाचा पहिला सुपुत्र मनू याने हा ग्रंथ लिहिला असून प्राचीन हिंदू धर्मशास्त्रत त्याला मान्यता आहे.
त्याला विधी ग्रंथही म्हटल्या जाते. इंग्रज राजवटीत सर विलियम जोन्स यांनी 1794 मध्ये या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांनी या ग्रंथाचा भाग हिंदू कायद्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
भावनांचा उद्रेक
वेदशास्त्रसंपन्न विष्णूशास्त्री बापट यांनी ‘सार्थ श्रीमनुस्मृती’, अशा नवीन नवाने मनुस्मृतीचे मराठीत भाषांतर करून प्रकाशन केले आहे. हा ग्रंथ राज्यातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध करण्यात आला आहे. ग्रंथात मूळ लिखाणाचा संदर्भ देऊन विविध समाज बांधवांच्या भावना दुखावण्यात आलेल्या आहेत.
शुद्र हा ब्राह्मणाचा दास
मनुस्मृतीच्या अध्याय 8 मध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र या चातुर्वणातील शुद्राचा उल्लेख ब्राह्मणांचा स्वयंभू दास (गुलाम), असा करण्यात आलेला आहे. दासांच्या स्वामीने (मालकाने) शुद्रास जरी आपल्या दास्यातून मुक्त केले तरी तो ब्राrाणाच्या दास्यातून मुक्त होत नाही. कारण दास्य हे शुद्रांचे जन्माबरोबर त्याच्या माथी बसलेले सहज कर्म आहे. सात प्रकारचे दास सांगण्यात आले आहे. लढाईतून जिंकून आणलेल्यास जाहृत, भोजनाकरिता झालेला दासाला भक्तदास, दासीपुत्रला गृहज, विकत घेऊन आणलेल्यास क्रीत, दुस:या कोणी दान दिलेल्यास दत्त, पिता, पितामह इत्यादी वडिलांपासून असलेल्या पैत्रिक आणि दंडाचे धन फिटेर्पयत ज्याने दास्यत्व पत्करले आहे त्याला दंडदास म्हटल्या गेले. ब्राह्मण विद्वान असो की अविद्वान असो ते मोठे दैवत आहे.
‘ग्रंथाची विक्री थांबवून फौजदारी कारवाई करा’- डॉ. राजेंद्र पडोळे
मनुस्मृती या बंदी असलेल्या ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून ते नव्या स्वरूपात प्रकाशित करून मोठय़ा प्रमाणावर विक्री करून तेली आणि अन्य समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. विक्षिप्त लिखाण असलेल्या या ग्रंथावर महाराष्ट्र शासनाने दहा वर्षापूर्वी बंदी घातलेली आहे. हे माहीत असूनही जाणीवपूर्वक हा ग्रंथ सार्वजनिकरीत्या विक्रीस आणण्यात आला आहे. या ग्रंथाचा भाषांतरकार, प्रकाशक, मुख्य वितरक आणि विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, ग्रंथाची विक्री त्वरित थांबवण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तेली समाज महासंघाचे सचिव डॉ. राजेंद्र पडोळे यांनी दिला आहे. याच महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रमेश पिसे, कार्याध्यक्ष विलास काळे, डॉ. महेंद्र धावडे, सुरेश चरडे आदींनी घाईत आयोजित केलेल्या एका पत्रकारपरिषदेत ग्रंथ प्रकाशकाचा निषेध करून ग्रंथ प्रकाशनामागील हेतू काय याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वादाची स्मृती!
ग्रंथातील पृष्ठ 93, अध्याय 4 मध्ये नमूद संस्कृत श्लोकाचा मराठीतील अर्थ असा, पशु मारून मांस विक्रय करणारे, तीळ, करडय़ा, भुईमूग इत्यादी बीजे चुरून तेल काढणारा व त्यावर उपजीविका करणारे तेली, मद्याच्या विक्रयावर निर्वाह करणारे कलाल व वेश्येच्या वेतनावर उपजीविका करणारे कुंटण पुरुष किंवा स्त्रिया यांच्यापासून दान घेऊ नये, असे यात नमूद आहे.
कोणतीही स्त्री स्वातंत्र्ययोग्य नाही
विवाहापूर्वी स्त्रियांचे रक्षण पित्याने, विवाहानंतर पतीने आणि शेवटी पुत्राने करावे, अर्थात कोणतीही स्त्री स्वातंत्र्ययोग्य नाही. ज्या कन्येचे वाग्दान झाल्यावर पती मरतो तिच्याशी तिच्या पतीच्या सख्ख्या भावाने विवाह करावा, पहिल्या ऋतूप्राप्तीपासून आठ वर्षांपर्यंत जिला अपत्य होत नाही, तिच्या पतीने आठव्या वर्षी दुसरा विवाह करावा, जिची अपत्ये होऊन मरत असतील तिच्या पतीने दहाव्या वर्षी, जिला कन्याच होत असतील तिच्या पतीने अकराव्या वर्षी दुसरा विवाह करावा, जी अप्रिय भाषण करणारी असेल आणि निपुत्रिक असेल तिच्या पतीने तात्काळ दुसरा विवाह करावा, पुरुषाने दुसरा विवाह केला असता जी स्त्री रागावून निघून जाते तिला पतीने तात्काळ माहेरच्या लोकांपाशी पोहोचवावे, जिला ऋतू प्राप्त झाला आहे, अशी कन्या मरेर्पयत पित्याच्या घरी राहिली तरी चालेल, पण तिला विद्यागुणरहित वरास कधीही देऊ नये, असे मनुस्मृतीच्या अध्याय 9 मध्ये नमूद आहे.
ग्रंथाची विक्री न थांबवल्यास बुकस्टॉलवर हल्ला करू - जितेंद्र आव्हाड
दरम्यान मनुस्मृती ग्रंथाच्या पुनर्विक्रीमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकारण्यांनी याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर ' ग्रंथांची विक्री न थांबवल्यास बूक स्टॉलवर हल्ला करू' अशी धमकी दिली आहे. ' विक्री न थआंबवल्यास हिंसक प्रत्युत्तरासाठी तयार रहा, तुमचे दुकान/स्टॉल फोडण्यात येईल' असा धमकीवजा इशारा आव्हाड यांनी ट्विटरवरून दिला आहे.
Warning stop selling #Manusmruti or b ready for violent reaction ur shops/ stalls will b vandalised @abpmajhatv@mimarathinews@DailyO_ /
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 9, 2016