युती झाल्यानं उमेदवार जोशात; पण बंडखोरीच्या चिंतेमुळे उद्धव ठाकरे पेचात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 01:12 PM2019-03-05T13:12:21+5:302019-03-05T13:15:07+5:30
एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असल्यानं मातोश्रीसमोर पेचप्रसंग
मुंबई: शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केल्यानंतर पक्षाच्या काही खासदारांनी चिंता व्यक्त केली होती. पक्ष स्वबळावर लढल्यास जागा राखणं कठीण असल्याचं जवळपास 10 खासदारांनी ठाकरे यांना सांगितलं. यानंतर युती झाली. त्यामुळे खासदारांचा जीव भांड्यात पडला. मात्र आता त्यांच्यासमोर एक नवीच समस्या निर्माण झाली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे.
सध्या लोकसभेत शिवसेनेचे 18 खासदार आहेत. यापैकी 10 खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे युतीसाठी हट्ट धरला होता. युती झाल्यानंतर शिवसेनेचे बरेचसे खासदार निर्धास्त झाले होते. मात्र आता या खासदारांना वेगळीच चिंता सतावते आहे. औरंगाबाद आणि नाशिकमधील शिवसेनेच्या खासदारांपुढे पक्षाच्याच जिल्हाप्रमुखांचं आव्हान आहे. चंद्रकांत खैरे औरंगाबादचे खासदार आहेत. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आग्रही आहेत. तर नाशिकमध्येदेखील खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचं आव्हान आहे.
यवतमाळ आणि रायगड मतदारसंघदेखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता आहे. भावना गवळी यवतमाळच्या विद्यमान खासदार आहेत. खैरे आणि गोडसे यांच्याप्रमाणे गवळी यांच्यासमोर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचं आव्हान नाही. मात्र या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड उत्सुक आहेत. रायगडमध्ये खासदार अनंत गीते यांना उमेदवारी दिल्यास कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. केंद्रात मंत्री झाल्यानंतर गीते मतदारसंघात फिरकलेच नाहीत. त्यामुळे गीते यांच्यासाठी मतं मागायची कशी, असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत. त्यामुळे शिवसेना नेतृत्त्वासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
विद्यमान खासदारांना संधी दिल्यास जिल्हाप्रमुख किंवा शिवसेनेचे मंत्री त्यांना सहकार्य करण्याची शक्यता कमीच आहे. विद्यमान खासदारांचं तिकीट कापून इतरांना संधी दिल्यास त्या उमेदवाराला खासदार मदत करणार का, हादेखील प्रश्नच आहे. त्यामुळे आता कोणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न मातोश्रीसमोर आहे.