अनेक जलद लोकलना फटका
By admin | Published: June 14, 2016 03:08 AM2016-06-14T03:08:13+5:302016-06-14T03:08:13+5:30
मालगाडीच्या क्रॉसिंगमुळे मध्य रेल्वेच्या जलद लोकल सेवेला फटका बसून जलदचे वेळापत्रक कोलमडत आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात अप-डाउन मार्गावर मालगाड्यांची
डोंबिवली : मालगाडीच्या क्रॉसिंगमुळे मध्य रेल्वेच्या जलद लोकल सेवेला फटका बसून जलदचे वेळापत्रक कोलमडत आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात अप-डाउन मार्गावर मालगाड्यांची वाहतूक होते. बहुतांशी वेळात त्या गाड्या तांत्रिक कारणामुळे थांबतात. त्यामुळे जलदच्या लोकल वाहतुकीचे वेळापत्रक प्रभावित होते.
दिवा-मुंब्रा आणि कळवा भागात पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जलदच्या ट्रॅकवरूनच लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांसह मालगाड्या धावतात. त्यांचे दिव्यात क्रॉसिंग होते. त्यासाठी बराचसा वेळ लागतो. दिवसभरातून साधारणपणे १० वेळा असे क्रॉसिंग होते. त्यातील सहा लोकलच्या वेळा आणि मालगाड्यांच्या वेळा सारख्याच येतात. त्यामुळे जलदच्या लोकलना थांबावे लागत असल्याने त्यातील प्रवाशांचाही खोळंबा होतो. अन्य चार वेळांमध्ये लोकल अथवा मालगाडीची वेळ मागे-पुढे झाल्यासही ती समस्या भेडसावते.
यासाठी मालगाड्यांसह अन्य लांब पल्ल्यांचे क्रॉसिंग जेव्हा होते, तेव्हा लोकल त्या ट्रॅकवर नसतील, असा महत्त्वाचा बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी दिवा स्थानक प्रबंधकांसह सुरक्षा व्यवस्थेने याबाबत महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक आदींना सूचित करावे, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त
केली. (प्रतिनिधी)
मुंब्रा, दिवा मार्गावर ही समस्या प्रकर्षाने भेडसावते. पारसिक टनेलमधून मालगाड्या विशिष्ट वेगाने धावतात. त्यात डोंबिवली-कल्याण येथून निघालेल्या जलद मार्गावरील लोकल दिवा-दातिवली मार्गावर थांबतात. त्यात अन्य गाड्यांच्या वेगावर परिणाम होतो.