Samruddhi Mahamarg: समृद्धीसाठी अनेकांनी अडचणी आणल्या, पण आम्ही पुरून उरलो; एकनाथ शिंदेंचा रोख कोणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 06:25 AM2022-12-12T06:25:41+5:302022-12-12T06:25:57+5:30
शिंदे यांनी मांडला बांधकाममंत्री ते मुख्यमंत्री प्रवास
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना, त्यांनी समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली. या कामासाठी माझ्यावर विश्वास दाखविला. या मार्गात अनेकांनी अडचणी आणल्या. विरोध करायला लावला. अडविण्यासाठी प्रयत्न केले. पण फडणवीस व मी सर्वांना सोबत घेऊन काम केले. या मार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले याचा आनंद आहे. हा क्षण स्वप्नपूर्ती आनंद व अभिमानाचा आहे. अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
हा मार्ग जागतिक दर्जाचा असल्याचे सांगताना शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मला सोबत घेत या मार्गावर गाडी चालविली. तेव्हा पोटातील पाणीही हलले नाही. या प्रकल्पासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन झाले. शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला. या मार्गालगत उद्योग, शिक्षण, आरोग्य व लॉजिस्टिक हब उभारले जातील. लाखो लोकांना रोजगार मिळेल. २४ जिल्ह्यांना याचा फायदा होईल, असे शिंदे म्हणाले.
हा प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. हे सरकार सामान्य लोकांचे सरकार असल्याचे सांगत आम्ही मेहनत करू, तुम्ही सहकार्य करा, अशी अपेक्षा शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमक्ष व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर मोदींची कौतुकाची थाप
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणप्रसंगी कोनशिलेचे अनावरण करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपस्थित मान्यवर फोटो काढण्यासाठी उभे होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संकोचाने थोडे दूर उभे राहत असल्याचे पाहताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना जवळ ओढून घेतले आणि पाठीवर कौतुकाची थाप दिली.