सत्ता परिवर्तनामुळे अनेकांचे आयुष्य बेचव झाले आहे - मुख्यमंत्री ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 04:06 AM2020-07-26T04:06:38+5:302020-07-26T04:07:00+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची लक्षणे वेगवेगळी आहेत. ताप येणे हेही कोरोनाचे लक्षण आहे. काही जणांची चव जाते. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून अनेकांचे आयुष्य बेचव झालेले असू शकते, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय इकडे मी लक्ष देत नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. बोलणारे बोलत राहतील. कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. ही कदाचित त्यांची पोटदुखी असेल, असा टोलाही ठाकरेंनी लगावला. खा. संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आमदारांचा पगार महाराष्टÑाला न देता त्यांनी तो दिल्लीत दिला. त्यामुळे कदाचित ते सतत दिल्लीत जात असावेत, असा चिमटा काढून ठाकरे म्हणाले, ते तेथील कोरोनाची परिस्थिती पाहत असतील, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा कारभार घरातून करत आहेत, आॅन फिल्ड येत नाहीत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कितीतरी काम करतोय, व्हिडीओ कॉन्फरन्स्ािंंगद्वारे अनेकांशी चर्चा करतोय. आमदारांशी चर्चा होतेय. मी घरात बसून सगळीकडे जाऊ शकतो. हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्य कव्हर करत आहे. ताबडतोब निर्णय घेत आहे, असेही ते म्हणाले.
कोरोनाबाबत अमेरिकेने जे केले ते करण्याची माझी तयारी नाही. मी म्हणजे काही ट्रम्प नाही. लोकांना डोळ्यांपुढे तडफडताना मी बघू शकत नाही. त्यामुळे एक गोष्ट ठरवा, लॉकडाऊन गेला खड्ड्यात, जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्हाला लॉकडाऊन नको, ठरवता का बोला, अशी विचारणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.