विरोधकांच्या अनेक कुंडल्या माझ्या हातात - मुख्यमंत्री
By admin | Published: October 6, 2016 05:14 AM2016-10-06T05:14:50+5:302016-10-06T05:14:50+5:30
विरोधकांचे नाक दाबण्यासाठी अनेक कुंडल्या माझ्या हातात आहेत. विरोधकांसाठी अनेक अस्त्र सांभाळून ठेवली आहेत. कुठले अस्त्र कधी वापरायचे हे मी ठरवेन.
मुंबई : विरोधकांचे नाक दाबण्यासाठी अनेक कुंडल्या माझ्या हातात आहेत. विरोधकांसाठी अनेक अस्त्र सांभाळून ठेवली आहेत. कुठले अस्त्र कधी वापरायचे हे मी ठरवेन. तुम्ही न डगमगता स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीला सामोरे जा, आक्रमक राहा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा देत भाजपा पदाधिकाऱ्यांना स्थानिक निवडणुकांच्या तयारीला लागण्याचा संदेश दिला.
दादर येथील भाजपा कार्यालयात बुधवारी प्रदेश कार्यकारणीच्या दोन दिवसीय बैठकीला सुरुवात झाली. एकीकडे मराठा आरक्षणावरून वातावरण तापत असतानाच स्थानिक स्वराज संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विरोधकांनी पद्धतशीरपणे सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न चालविल्याची भावना भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीच्या पहिल्याच
दिवशी मराठा आरक्षणावरून पदाधिकाऱ्यांना आश्वस्त करतानाच विरोधकांना थेट इशारा दिला. राज्यात आपण मुख्य पक्षाच्या भूमिकेत आल्यामुळे सर्व पक्ष आपल्या विरोधात आले आहेत. विरोधकांना न डगमगता आक्रमकपणे आपण केलले काम जनतेसमोर मांडा. विरोधकांसाठी अनेक अस्त्र माझ्या हातात आहेत. कुठले अस्त्र कधी वापरायचे हे मी ठरवेन तुम्ही विरोधकांची चिंता करू नका, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केल्याची माहिती बैठकीत उपस्थित असणाऱ्या सूत्रांनी दिली.
जे ५०-५५ वर्षे सत्तेत होते तेच आज छाती पुढे काढून मराठा समाज मागे का, असा प्रश्न करत आहेत. इतकी वर्षे राज्य करून ७५ टक्के समाज मागे का, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. लाखोंच्या संख्येने निघणारा मराठा समाजाचा मोर्चा प्रस्थापितांच्या विरोधात वंचितांचा मोर्चा आहे. तो भाजपा विरोधात नाही. मराठा आरक्षणाबाबत आमची भूमिका संवेदनशीलतेची आहे. आरक्षण देण्याची आहे. घटनेच्या चौकटीत राहून मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर, मराठा आरक्षणाला भाजपाचा पाठिंबा असून तसा ठराव गुरुवारी कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)