‘ पोस्ट ’ चा भडिमार येऊ शकतो अंगलट : तज्ज्ञांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 03:34 PM2020-02-17T15:34:44+5:302020-02-17T15:41:33+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अश्लील व्हिडिओवर यंत्रणेचा वॉच
नारायण बडगुजर -
पिंपरी : सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे दाखविण्यासाठी अनेकांकडून पोस्टचा भडिमार केला जातो. यात लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ, फोटोदेखील असतात. सहजच गंमत म्हणून अशा पोस्ट जाणते-अजाणतेपणी व्हायरल होतात. यात विकृत मानसिकतेच्या अनेकांकडूनदेखील असे कृत्य होते, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. यात सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांनी पुढे येऊन अशा पोस्ट रोखल्या पाहिजेत. त्याबाबत सतर्क राहिले पाहिजे, अन्यथा हा प्रकार अंगलट येऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी केंद्र शासनाने त्याबाबत कायदे अस्तित्वात आणून त्यांच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. त्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अश्लील व्हिडिओवर यंत्रणेचा वॉच आहे. त्यानुसार पोलिसांच्या सायबर सेलकडून अशा व्हिडिओंची तपासणी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे अशा विकृत मानसिकतेच्या अनेकांचे धाबे दणाणले आहे. याबाबत काही तज्ज्ञांनी ' लोकमत ' कडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सोशल मीडियाचा वापर करताना मोबाइलधारकांनी सजग रहावे, असा त्यांचा सूर होता.
प्रत्येकाला पाहिजे तेवढे इंटरनेट वापरता येते. त्यातच प्रोजेक्ट करायचा आहे, अभ्यासाशी संबंधित माहिती इंटरनेटवरून शोधायची आहे, असे कारण पुढे करून पालक सहजच आपल्या मुलांना स्मार्ट फोन देतात. मात्र, मुलांकडून त्याचा वापर योग्य होतो किंवा नाही, याबाबत खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे मुलांच्या हातात नको त्या वयात मोबाइल येतो. त्यातून ते सोशल मीडियाशी जोडले जातात. तेथे अनेक फोटो, व्हिडिओ व माहिती नको असतानाही त्यांच्याकडे येते. यातून त्यांची अनुभूती संपते. अर्थात असे कृत्य माझ्यासोबत झाले तर, मला किती त्रास होईल, असा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. यातूनच असे व्हिडिओ पाहण्याचे व व्हायरल करण्याचे प्रकार वाढतात. हीच मुले मोठे होऊन गैरकृत्य करतात.
मोबाईल गेममधील स्वारस्य संपल्यानंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करून आनंद मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. समाजातून ह्यलाजह्ण संपली आहे. आपल्याला स्वत:ची लाज असते. मात्र, आता ती राहिलेली नाही. त्यामुळेदेखील समाजात अशा प्रवृत्ती वाढत आहेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
असे व्हिडिओ व फोटोज किंवा माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्याची ऑप्टेशन अर्थात तीव्र इच्छा अनेकांमध्ये दिसून येते. यातून सदरची माहिती नेमकी काय आहे, त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होते किंवा नाही, याचीही खातरजमा करून घेतली जात नाही. प्रत्येकाने त्याबाबत खबरदारी घ्यावी.
- स्मिता कुलकर्णी, मुलांमधील समस्यांविषक समुपदेशक
मोबाइल गेम खेळताना मिळणारा आनंद कमी झाला की, आनंद मिळविण्यासाठी इंटरनेटवर इतर व्हिडिओ किंवा माहिती ह्यसर्चह्ण करतात. यातून बाहेर येण्यासाठी ते स्वत: तसेच इतरांकडूनही प्रयत्न केला जात नाहीत. अशा मुलांना किवा व्यक्तींना मानसिक आजार आहे का, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय, याची पाहणी केली पाहिजे.
- डॉ. मनजित संत्रे, मानसोपचारतज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय, पिंपरी.
....................
मोबाइल वापरकर्त्यांना सोशल मीडियाचे आकर्षण असते. सर्वात आधी आपणच पोस्ट व्हायरल केल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. यातून चुकीच्या पोस्ट व्हायरल होतात. लहान मुलांबाबतचे गंमतीशीर मात्र अश्लीलता असलेले व्हिडिओदेखील अपलोड केले जातात. हे प्रकार थांबविले पाहिजेत.
- आनंद गोरे, प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी.
............
गुड टच, बॅड टच अर्थात स्पर्श भावनेबाबत लहान मुलांना ज्ञान दिले पाहिजे. त्यासाठी पालकांना प्रशिक्षण दिले पाहिजे. मुले थेट मोबाइल किंवा इंटरनेटपर्यंत पोहचणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. संस्कारक्षम वय असते. अशावेळी त्यांच्यावर होणारे अत्याचार त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
- साधना दातीर, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघ.