अनेक बाबींचा झाला उलगडा
By admin | Published: September 1, 2015 02:15 AM2015-09-01T02:15:57+5:302015-09-01T02:32:43+5:30
एप्रिल २०१२मध्ये झालेल्या शीना बोराच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी गेल्या मंगळवारी तिची आई इंद्राणी मुखर्जी आणि श्याम राय यांना अटक केली होती
मुंबई : एप्रिल २०१२मध्ये झालेल्या शीना बोराच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी गेल्या मंगळवारी तिची आई इंद्राणी मुखर्जी आणि श्याम राय यांना अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकात्यातून अटक केली होती. याप्रकरणी आत्तापर्यंत इंद्राणीचा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा आणि मृत शीनाचा भाऊ मिखाईल बोरा, तिसरा पती पीटर मुखर्जी, तसेच त्याचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आणि शीनाचा प्रियकर राहुल मुखर्जी यांच्याकडे आयुक्त राकेश मारिया यांच्यासह तपास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली आहे. त्यातून या हत्याकांडामागील अनेक
बाबींचा उलगडा झाला आहे. तरीदेखील शीनाच्या खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इतर बाबींबरोबरच मिखाईलला केलेल्या विषबाधेबाबत विचारणा करावयाची आहे, तसेच पेण येथून मिळालेल्या मानवी सांगाड्याबाबत फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे आरोपीची कोठडी आवश्यक असल्याचे
सरकार पक्षाकडून न्यायालयाला सांगण्यात आले. त्याला विरोध करतानाच, पोलिसांनी इंद्राणीला वैयक्तिकपणे भेटू दिलेले नाही, भेटीवेळी पोलीसही तिथे उपस्थित होते. त्यामुळे
त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केल्याचा आरोप बचाव पक्षाने केला.
इंद्राणीची प्रकृती ठिक नसल्याने तिला घरातील जेवण व औषधे देण्याची मागणी त्यांनी केली. त्याला सरकार पक्षाने आक्षेप घेतले, हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे असल्याने अन्नातून विषबाधा होण्याची भीती व्यक्त केली.
महानगर दंडाधिकाऱ्यांनी हे ग्राह्य धरत बचाव पक्षाची मागणी अमान्य केली. मात्र सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनुसार औषधे देण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
खुनाचा प्रयत्नाचेही कलम
या तिघांनी आपल्याला वरळी येथील निवासस्थानी बोलावून शीतपेयातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, असा जबाब मिखाईल बोराने पोलिसांकडे दिला आहे. पोलिसांनी मिखाईलच्या हत्येसाठी आणलेली सुटकेसही जप्त केली आहे. याप्रकरणी तिघा आरोपीवर मिखाईलच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम ३०७ व विष दिल्याबद्दल ३२८ हे अतिरिक्त कलम लावण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
शिना बोरा खून प्रकरणी पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभागातील जातपडताळणी विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश मिरगे यांची चौकशी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शिना बोरा हत्येप्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जीसह तिचा पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्याम राय यांना अटक करण्यात आली आहे.
शिनाची २०१२ मध्ये निर्घृण हत्या करुन तिचा मृतदेह पेणजवळ टाकून देण्यात आला होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक मिरगे तेथे नेमणुकीस होते. अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतरही घटनास्थळाला भेट दिलेच्या नोंदी पोलीस ठाण्याच्या डायरीमध्ये करण्यात आलेल्या नव्हत्या. या प्रकरणी चार पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.