अनेक गावांना अद्याप टँकर नाहीत
By Admin | Published: June 13, 2016 01:38 AM2016-06-13T01:38:52+5:302016-06-13T01:38:52+5:30
भोर तालुक्यातील टँकरग्रस्त १४ गावे आणी २८ वाड्या-वस्त्यांनी ४ टँकर व २ पिकअप जीपने दीड महिन्यापासून पाणीपुरवठा सुरू आहे
भोर : भोर तालुक्यातील टँकरग्रस्त १४ गावे आणी २८ वाड्या-वस्त्यांनी ४ टँकर व २ पिकअप जीपने दीड महिन्यापासून पाणीपुरवठा सुरू आहे, तर टँकर मागणी केलेल्या अनेक गावांना अद्याप टँकर सुरू झाले नाहीत.
जुन महिना निम्मा संपत आला तरी पावसाने ओढ दिल्याने आणी वळवाचा पाऊसही पडला नाही आणी दोन्ही धरणांतही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे टँकर वाढवून अजून काही दिवस टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
भाटघर धरणात सध्या ७.२९ टक्के, तर नीरादेवघर धरणात फक्त १.९९ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून त्यातील निम्मा गाळच आहे.त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नळपाणीपुरवठा योजनांपैकी काही बंद आहेत, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर असून पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. नीरादेवघर धरण भागातील व महुडे व वीसगाव खोऱ्यातील गावामध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू असल्याने १४ गावे, २८ वाड्या-वस्त्यांनी टँकरमागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे दोन महिन्यांपूर्वीच सादर केले होते.त्यानंतर २७ एप्रिलपासुन टँकर सुरू करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने टँकर वाढत असून, सध्या ४ टँकर व २ पिकअप जिपने पाणीपुरवठा सुरू आहे. दलितवस्ती,मातंगवस्ती,आखाडेवस्ती भानुसदरा,हुंबेवस्ती, गोरेवस्ती,पसुरेची धनगरवस्ती, तळजाईनगर भुतोंडे,डेरे गृहिणी गुढेचे निवंगण,कळंबाचा माळ,दुर्गाडी मानटवस्ती,रायरी धारांबे वाडी,अशिंपीची उंबार्डेवाडी, शिळिंबची राजिवडी, शिरगावची पातरटकेवाडी डेहेणची जळकेवाडी, सोनरवाडी, हुंबेवस्ती या गावांना व वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे.मात्र, टॅकर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे दोनतीन दिवसांतून टँकर जात आहे, तर वीज नसल्याने अनेक गावांना पाणीपुरवठा करता येत नाही. पाणीपुरवठा बंद असल्यामुळे लोकांचे व जनावरांचे पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत. (वार्ताहर)
>जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा ठेका सोनाई दूध वाहतूक संस्था इंदापूर यांना मिळाला आहे.नीरादेवघर व भाटघर धरण भागात दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.मात्र, दोन्ही धरणभागातील गावांच्या अंतराचा विचार केल्यास टँकरची दररोज एक खेप पडणे शक्य होत नाही, त्यामुळे अनेक गावांना तीन दिवसांतून एकदाच पाणी मिळत असल्याचे किसन दिघे यांनी सांगितले जुन महिना निम्मा संपला, तरी अद्याप पाऊस सुरू झाला नाही. सध्या चार टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पावसाची अशीच परिस्थती राहिल्यास टँकर कधी मंजूर होणार, आणि लोकांना पाणी कधी मिळणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करित आहेत.
वीसगाव खोऱ्यातील वरोडी खुर्दची धनावडेवाडी,शेरताटी बालवडी,वरोडी डायमुख,वरोडी बु,पळसोशी महामार्गावरील ससेवाडी व भाटघर धरण भागातील अनेक गावांनी टँकर मागणी करुनही जुन महिना निम्मा संपला, तरी अद्याप टँकर सुरू करण्यात आले नाही.