...अन् एकाएकी यूट्यूबवरुन डिलीट होऊ लागले इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 02:28 PM2020-02-16T14:28:54+5:302020-02-16T14:30:38+5:30
वादग्रस्त विधानामुळे इंदुरीकर महाराज अडचणीत
मुंबई: कीर्तनकार इंदुरीकर महाराज सध्या वादात सापडले आहेत. ओझर येथील एका कीर्तनात मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात इंदुरीकर महाराजांनी केलेलं विधान वादग्रस्त ठरलं आहे. यामुळे मनस्ताप सहन कराव्या लागल्या इंदुरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्यांना इशारा दिला. त्यामुळे इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ अपलोड करणाऱ्या अनेकांनी स्वत:हून व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात केली आहे.
इंदुरीकर महाराजांचे हजारो व्हिडीओ यूट्यूबवर आहेत. त्यांना मिळालेले व्ह्यूज लाखोंच्या घरात आहेत. इंदुरीकर महाराज कीर्तनासाठी महाराष्ट्रभर प्रवास करतात. अनेक जण त्यांच्या कीर्तनाचं चित्रिकरण करतात. त्यानंतर ते स्वत:च्या यूट्यूबवर अपलोड करुन लाखो रुपये कमावतात. व्हायरल झालेल्या याच व्हिडीओंमुळे इंदुरीकर महाराज अडचणीत आले आहेत. त्यामुळेच त्यांनी यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्यांना थेट इशारा दिला. याचा धसरा घेऊन यूट्यूब अनेक चॅनेल चालवणाऱ्या अनेकांनी इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात केली.
कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मतं मांडणारे इंदुरीकर महाराज मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकारामुळे इंदुरीकर महाराज उद्विग्नता व्यक्त केली. दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे काही बोललो, ते चुकीचं नाहीच. त्याला अनेक ग्रंथांचा संदर्भ आहे, असा खुलासा इंदुरीकर महाराजांनी केला.
वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,' अशी भावना इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली. या वादाचं खापर इंदुरीकर महाराजांनी यू ट्युब चॅनेल आणि कॅमेरावाल्यांवर फोडलं. 'यू ट्युबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदुरीकरला संपवायला निघालेत. मात्र मी कशातही सापडत नसल्यानं मला नको त्या प्रकरणात गुंतवण्याचा आटापिटा सुरू आहे. मी आता एका वेगळ्या निर्णयापर्यंत आलेलो आहे. आता लय झालं. एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा. फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची क्षमता संपलेली आहे,' असं म्हणत त्यांनी कीर्तनाला पूर्णविराम देण्याचे संकेत दिले.