मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल; "छगन भुजबळांची सावलीही कुणावर पडू नये, इतकं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:51 PM2023-11-30T12:51:04+5:302023-11-30T12:51:36+5:30
मंत्री छगन भुजबळ आज त्यांच्या येवला मतदारसंघात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत.
जालना - मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध अद्याप सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण द्या परंतु ओबीसी कोट्यातून नको अशी भूमिका भुजबळांनी मांडली. त्यामुळे भुजबळ सध्या मराठा समाजाच्या टार्गेटवर आहेत. नाशिक इथं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री भुजबळ पाहणी दौरा करत आहेत. यातही मराठा समाजाने त्यांना विरोध केला. तर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांचा पुन्हा एकेरी उल्लेख करत भुजबळांची सावलीही कुणावर पडू नये अशी खोचक प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्यांच्यावर काही बोलायचे नाही. मराठा समाजच नव्हे तर ओबीसी समाजही त्यांना विरोध करतोय. तो काय माणूस आहे का? कायद्याच्या पदावर बसतो आणि काहीही बरळतो.बांधावर कशाला जातो, आणखी पीक खराब होईल. पावसाने आधीच शेतकऱ्यांचे वाटोळे केलंय तू तिथं जाऊन आणखी कशाला करतो. भुजबळांची सावलीही कुणावर पडू देऊ नये कुणावर..इतका खालच्या विचारांचा तो माणूस आहे. घटनेच्या पदावर बसतो आणि कायदाच पायदळी तुडवतो. जातीजातीत तेढ निर्माण करतो. ओबीसी-मराठा बांधव गावखेड्यात एकत्र आहेत. हा उगाच कलंक आहे असं त्यांनी सांगितले.
तर १ ते १२ डिसेंबरच्या काळात विदर्भ, मराठवाडा, खान्देश असा दौरा करणार आहे. घराघरातील मराठा समाज आरक्षणाच्या लढाईत उतरला आहे. आतापर्यंत ३२ लाख नोंदी सापडल्या आहेत. २४ डिसेंबरपर्यंत आम्ही डेडलाईन दिली आहे. दगाफटका होणार नाही तरीही आम्ही सज्ज आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १०० टक्के मराठा समाजाला आरक्षण देणार कारण ते नाराजी पत्करू शकत नाहीत. मराठ्यांचा रोष सरकारला परवडणारा नसेल. दोन्ही उपमुख्यमंत्रीही त्यांना पाठिंबा देतील. त्यामुळे २४ डिसेंबरपर्यंत सरकार मराठा आरक्षण देईल अशी खात्री आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
भुजबळांच्या पाहणी दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध
मंत्री छगन भुजबळ आज त्यांच्या येवला मतदारसंघात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. यावेळी कोटमगाव येथे त्यांना मराठा आंदोलक शेतकरी जमा झाले. तेव्हा आंदोलकांनी भुजबळ गो बॅक च्या घोषणा दिल्या जात आहेत. तसेच होय, सातबारा आमच्याच बापाचा असल्याचे सांगत भुजबळ यांना बांधावर पाहणीसाठी जाण्यास विरोध दर्शविला आहे. यावेळी मोठया संख्येने मराठा आंदोलक जमा झाले होते.