पोलिस भरतीत मराठा उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ नाहीच!, अपर पोलिस महासंचालकांचे पत्र
By उद्धव गोडसे | Published: July 18, 2024 03:43 PM2024-07-18T15:43:41+5:302024-07-18T15:44:12+5:30
कोल्हापुरात २३ उमेदवार
कोल्हापूर : पोलिस भरतीसाठी ईडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल घटक) प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. त्याऐवजी एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिक इतर मागास प्रवर्ग), ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) आणि खुल्या प्रवर्गाची निवड करावी लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी मंगळवारी (दि. १६) जारी केले. त्यामुळे पोलिस भरतीचा निकाल लांबणार असून, मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, अनेक मराठा उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रक्रियेत सहभाग घेतला. काही जिल्ह्यांत मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षाही झाली. आरक्षित जागांनुसार अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच अपर पोलिस महासंचालकांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाबद्दल महत्त्वाचे परिपत्रक काढले आहे.
ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना या प्रवर्गाऐवजी एसईबीसी, ओबीसी किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय द्यावा. त्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्याचे निर्देश सर्व पोलिस अधीक्षक कार्यालये आणि पोलिस आयुक्तालयांना दिले आहेत. निवड होणाऱ्या उमेदवारांना एसईबीसी किंवा ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत मिळणार आहे.
कोल्हापुरात २३ उमेदवार
कोल्हापुरात पोलिस शिपाई पदाच्या १५४ जागांसाठी झालेल्या प्रक्रियेत ईडब्ल्यूएस प्रवर्गातून २३ उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांना बोलवून घेऊन ईडब्ल्यूएसऐवजी अन्य प्रवर्गांचा पर्याय दिला जाणार आहे. तसेच उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.