करवीरनगरीमध्ये मराठ्यांची वज्रमूठ!
By admin | Published: October 16, 2016 04:37 AM2016-10-16T04:37:33+5:302016-10-16T04:37:33+5:30
नजर स्थिरावणार नाही, अशा अभूतपूर्व सकल मराठा क्रांती मोर्चाने शनिवारी केवळ कोल्हापूरच्याच नव्हे; तर महाराष्ट्राच्या इतिहासात एका उच्चांकी जनसमुदायाच्या
कोल्हापूर : नजर स्थिरावणार नाही, अशा अभूतपूर्व सकल मराठा क्रांती मोर्चाने शनिवारी केवळ कोल्हापूरच्याच नव्हे; तर महाराष्ट्राच्या इतिहासात एका उच्चांकी जनसमुदायाच्या उपस्थितीची नोंद केली. आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा वज्रनिर्धार मोर्चेकऱ्यांनी केला.
करवीर संस्थानचे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात ११४ वर्षांपूर्वी मराठा समाजासह बहुजनांना ५० टक्के आरक्षण दिले आणि संपूर्ण देशाला समानतेचा तसेच पुरोगामी विचार दिला, त्याच त्यांच्या भूतपूर्व संस्थानात कोल्हापुरात मराठा समाजाने एकजुटीने आरक्षणाची मागणी केली.
ऐतिहासिक कोल्हापूरकडे येणाऱ्या प्रमुख नऊ मार्गांनी सूर्योदयापासून अबालवृद्ध येत होते. त्यानंतर थोड्याच वेळेत भगव्या गर्दीने सर्वच प्रवेशद्वारे व्यापली. शहराच्या कोणत्याही रस्त्यावर नजर टाकली तर मोर्चेकऱ्यांचे जथ्थेच्या-जथ्ये दिसत होते. त्यामध्ये तरुणाई आघाडीवर होती; तर महिलांची संख्या लक्षवेधी होती. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील गांधी मैदान आणि ताराराणी चौक अशा दोन ठिकाणांहून सकाळी साडेदहा वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. महाविद्यालयीन तरुणी, महिला मोर्चाच्या अग्रभागी होत्या. त्यापाठोपाठ पुरुषांना प्रवेश देण्यात आला होता. दोन्ही ठिकाणांहून येणारे मोर्चे दसरा चौकात येण्यापूर्वीच हा चौक महिलांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाला होता. दुपारी बारापर्यंत
शहरात येणारे सर्व मार्ग गर्दीने हाऊसफुल्ल झाले. त्यामुळे लाखो लोकांना दसरा चौकापर्यंत पोहोचताही आले नाही. दुपारी सव्वाबारा वाजता दसरा चौकात कोपर्डीतील घटनेत बळी पडलेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत मुलींची भाषणे झाली; तर सुप्रिया युवराज दळवी या मुलीने मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन केले. त्यानंतर मुलींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन दिले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. (प्रतिनिधी)
- मोर्चामध्ये सुमारे ४० लाख मराठा व इतर समाज बांधवांची उपस्थित राहिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. मोर्चात शेजारच्या सीमाभागातील लाखाहून अधिक मराठी बांधवांनी सहभाग घेऊन मराठी अस्मिता नव्याने जागविली.
राज्यस्तरीय नेत्यांची उपस्थिती
मोर्चास मराठा समाजातील राज्यस्तरीय नेते उपस्थित होते. त्यामध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड, मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, विकास पाचलकर, मराठा समाज आरक्षण मसुदा समितीचे सदस्य प्रा. चंद्रकांत भराट, आप्पासाहेब कुडेकर आणि मनोहर निकम (तिघेही औरंगाबाद) आदी मान्यवर उपस्थित होते.