पवारांमुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित
By admin | Published: September 21, 2016 05:45 AM2016-09-21T05:45:42+5:302016-09-21T05:45:42+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून दीर्घकाळ वंचित राहावे लागले
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून दीर्घकाळ वंचित राहावे लागले, अशी टीका मराठा सुराज्य संघाचे प्रदेश अध्यक्ष प्रणय सावंत यांनी केली आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून मराठा सुराज्य संघाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २७ सप्टेंबरला एकाच दिवशी मोर्चे काढण्याची घोषणा केली आहे.
सावंत म्हणाले की, शरद पवार यांमुळेच मराठा आरक्षणाला दीर्घकाळ लागला. आघाडी सरकारने काढलेल्या शासन निर्णयात त्रुटी असल्याने मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. तरी प्रस्थापित राजकारण्यांमुळेच मराठा समाजाला वाईट दिवस आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, अशी मागणीही सावंत यांनी केली. अॅट्रॉसिटी कायद्यातील दाहकता मराठा आणि दलित समाजाला कळालेली नाही, त्यामुळेच त्याचा गैरवापर होत आहे, असा दावा त्यांनी केला.
ग्रामीण भागात सत्ता असलेल्या प्रस्थापित मराठा समाजाने समाजबांधवांसाठी काहीही केलेले नाही, असे सावंत म्हणाले. शिवाय ज्येष्ठ राजकीय नेते पतंगराव कदम आणि डी. वाय. पाटील यांनी सुरू केलेल्या शिक्षणसंस्थांमधून घेतल्या जाणाऱ्या डोनेशनमुळे मराठा समाजाला शैक्षणिक प्रगतीपासूनही वंचित राहावे लागले. म्हणूनच राजकीय पक्षांत विभागलेले मराठा समाजबांधव एकत्र आले आहेत. या प्रस्थापितांना बाजूला ठेवत ‘विस्थापितां’नी काढलेले हे मोर्चे नक्कीच आरक्षण मिळवतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
>शिक्षणसंस्थांवरही टीकास्त्र
ज्येष्ठ राजकीय नेते पतंगराव कदम आणि डी. वाय. पाटील यांनी सुरू केलेल्या शिक्षणसंस्थांमधून मराठा समाजाला शैक्षणिक प्रगतीची संधी उपलब्ध होती. मात्र याठिकाणी घेतल्या जाणाऱ्या डोनेशनमुळे मराठा समाजाला शैक्षणिक प्रगतीपासूनही वंचित राहावे लागले, अशी टीका सावंत यांनी केली.