मराठा समाजाचा हुंडाबंदी व सामुदायिक विवाहासाठी पुढाकार
By Admin | Published: April 24, 2017 03:51 AM2017-04-24T03:51:47+5:302017-04-24T03:51:47+5:30
राज्यातील मराठा समाजातील हुंडा परंपरेला मूठमाती देत, मुलामुलींचे सामुदायिक विवाह जुळवण्यासाठी मराठा समाजाने चळवळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्यातील मराठा समाजातील हुंडा परंपरेला मूठमाती देत, मुलामुलींचे सामुदायिक विवाह जुळवण्यासाठी मराठा समाजाने चळवळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मराठा हुंडाबंदी व सामुदायिक विवाह चळवळ सुरू करण्यात आली असून, ही चळवळ व्यापक करण्यासाठी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या यंत्रणेचा आधार घेतला जाणार आहे.
लातूरच्या शीतल व्यंकट वायाळ या तरुणीने आत्महत्या करताना लिहिलेल्या जळजळीत वास्तवामुळे मराठा समाज अस्वस्थ झाल्याचे चळवळीचे निमंत्रक संजीव भोर पाटील यांचे म्हणणे आहे. पाटील म्हणाले की, शीतलने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिलेल्या कारणांमुळे कोणतीही संवेदनशील व्यक्ती हुंड्याविरोधात कृती करण्यास भाग पडेल. मराठा समाजातील या बेदखल समस्येबाबत केवळ हळहळ करून चालणार नाही, तर त्यावर ठोस कृतीची गरज आहे. म्हणूनच पुन्हा कुठल्याही ‘शीतल’ला जीव द्यावा लागणार नाही, असे काम करण्यासाठी ही चळवळ उभारण्यात येत आहे.
या चळवळीत राजकीय पक्षांसह संघटनेत किंवा स्वतंत्रपणे कार्य करणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते, उद्योजक, नोकरदार, महिला, युवक-युवती अशा विविध स्तरातील समाजबांधवांना सामील करून घेतले जाईल. सर्वांच्या सहभागातून हुंडाबंदी आणि सामुदायिक विवाह या विषयांवर रचनात्मक कार्य करण्यासाठी चळवळ काम करेल. ही चळवळ कोणतीही संघटना, पक्ष किंवा राजकीय नेत्यांपासून स्वतंत्ररीत्या काम करील. याविषयी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर प्रभावीपणे काम करणारी यंत्रणाच निर्माण करण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)