फलटणमध्ये एकवटला अवघा मराठा समाज (फोटो स्टोरी )
By Admin | Published: September 18, 2016 03:01 PM2016-09-18T15:01:48+5:302016-09-18T15:12:17+5:30
फलटण शहरात आज दुपारी निघालेल्या मराठा समाजाच्या क्रांती मोर्चात लाखो बांधव सहभागी झाले. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते गर्दीने भरून गेले.
आॅनलाईन लोकमत
फलटण (सातारा), दि. १८ : फलटण शहरात आज दुपारी निघालेल्या मराठा समाजाच्या क्रांती मोर्चात लाखो बांधव सहभागी झाले. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते गर्दीने भरून गेले. रविवारी दुपारी साडेबाराला येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून मूक मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक चौक, गजानन चौक, महात्मा फुले चौक या मार्गाने तहसील कार्यालयावर गेला.
या मोर्चात फलटण तालुक्याबरोबरच आसपासच्या तालुक्यातीलही मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. कोपर्डी अत्याचार, मराठा आरक्षण अन एट्रासिटी कायदा यासह इतरही अनेक विषयांचे निवेदनही देण्यात आले. या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना इतर समाजातील लोकांनी जागोजागी पाणीवाटप केले.
हा मोर्चा फलटण शहरातील ऐतिहासिक ठरावा, यासाठी प्रथमपासूनच नियोजन करण्यात आले होते. तसेच शनिवारीही या मोर्चाच्या पूर्वसंध्येला पुन्हा आढावा घेण्यात आला होता.
या मोर्चात सुमारे लाखो मराठा समाजबांधव सहभागी झाले आहेत. मोर्चेकरांच्या वाहनांसाठी प्रत्येक ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली. तसेच पोलिसांनीही या मोर्चासाठी कडक बंदोबस्त तैनात केला होता.