...तर आरक्षणाची गरजच लागणार नाही; राज ठाकरेंनी सांगितला रामबाण उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 03:28 PM2019-05-13T15:28:58+5:302019-05-13T15:35:16+5:30
मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
ठाणे : लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचे उमेदवार नसतानाही अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला झोडपून काढले होते. महाराष्ट्रातला प्रचार थंडावल्याचे वाटत असतानाच राज ठाकरे यांनी पुन्हा राज्य सरकारवर शरसंधान साधले आहे. मराठा आरक्षणावरून सरकारला फसवायचच होतं, असा आरोप त्यांनी केला आहे.
मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळ, मराठा आरक्षण, नरेंद्र मोदींचे ढगाळ वक्तव्य आणि आंब्याच्या स्टॉलला तोडल्याविरोधात सडकून टीका केली.
मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात जाणारच होता. आरक्षण मिळू शकत नव्हतं, यामुळे समाजाला सरकार फसवणारच होतं, एवढी वर्षे महाराष्ट्रातल्या-देशातल्या तरुणांशी खेळ करत बसलात का तुम्ही, असा सवाल विचारत त्यांनी विद्यार्थ्यांना भेटणार असल्याचे राज यांनी सांगितले.
आरक्षण कोणत्या गोष्टींसाठी हवे आहे. शाळा-कॉलेज प्रवेश आणि नोकरीसाठीच ना, मग खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाहीच आहे. ८५ ते ९० टक्के उद्योग खासगी आहेत. मग कुठे नोकऱ्या देणार आहात असा सवाल उपस्थित करताना त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा सगळ्यांनी मान्य केलं होतं, मग अडलं कुठे, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मराठा आरक्षण मिळाल्यावर पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थानिकांना प्राधान्य देण्याचा मुद्दा मांडला. या राज्यात जेवढ्या नोकऱ्या निर्माण होताहेत किंवा शिक्षणसंस्था असतील, त्यात जर महाराष्ट्रातील मुलामुलींना प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच लागणार नाही, असे ते म्हणाले. याचबरोबर महाराष्ट्राचं पोटेन्शियल पाहिलं तर महाराष्ट्र उद्योगधंद्यांमध्ये खूप पुढे आहे. अशा परिस्थितीत सिक्युरिटी, रिक्षा, टॅक्सी काहीही असू दे महाराष्ट्रातील मुलांना प्राधान्य असेल तर आरक्षणाची आवश्यकताच लागणार नाही, असे राज यांनी सांगितले.