"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 05:17 PM2024-10-15T17:17:01+5:302024-10-15T17:19:45+5:30
Manoj Jarange Patil on Maharashtra Assembly election schedule: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अल्टिमेटम मनोज जरांगेंनी महायुती सरकारला दिला होता.
Manoj Jarange Patil Vidhan Sabha Election 2024: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा, तसेच सगेसोयरेबद्दल अधिसूचना काढण्याचा निर्णय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्या, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला होता. सरकारकडून याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यात आता विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन करत सरकारला इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मराठ्यांना बेचिराख करण्याचं काम केलं आहे. आमची आयुष्ये उद्ध्वस्त झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न झाला. मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं करता येईल, यासाठी सगळा सत्तेचा वापर देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात केला."
सरकारने ती आशा संपवली -मनोज जरांगे
"गोरगरीब मराठ्यांना आशा होती की, सरकार आरक्षण देईल. मराठ्यांच्या लेकरांचे मुडदे पाडून पापाचे वाटेकरी कधीच हे सरकार होणार नाही, याची आशा होती. ती सरकारने स्वतःहून संपवली", अशी टीका जरांगे यांनी केली.
"सत्ता मराठ्यांनी दिली होती, पण सत्तेचा गैरवापर करून पूर्णपणे मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी काम केलं. मराठ्यांची मुलं भिकारी झाली पाहिजे, या द्वेषाने, आकसाने देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी वागले. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली", असे जरांगे पाटील म्हणाले.
...तोपर्यंत मी शांत बसणार नाही, जरांगेंनी महायुतीला दिला इशारा
"मराठ्यांना डिवचण्यासाठी १७ जाती ओबीसींमध्ये घातल्या, पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. मागण्या मान्य करायच्या की नाही, हे तुमच्या हातात होतं कारण सत्तेत तुम्ही होतात. पण, आता मतं द्यायची की नाही, हे मराठ्यांच्या हातात आहे. तुम्ही आमची लेकरं भिकारी बनण्यासाठी सगळी शक्ती लावली. आता तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं की नाही, हे मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुपटा साफ केल्याशिवाय मी शांत बसत नाही. आणि समाज सुद्ध बसत नाही", असा इशारा मनोज जरांगेंनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर महायुतीला दिला.
मनोज जरांगे मराठा समाजाला काय म्हणाले?
"या सरकारनं जाणूनबुजून आपला अपमान केला. त्यांनी आपल्या विरोधात जाऊन ओबीसींमध्ये १७ जातींचा समावेश केला. तु्म्ही ठरवायचं आहे की, आता जात मोठी करायाची की, तुमचा आमदार मोठा करायचा आहे. त्यांना तुमची लेकरं मेली तरी काही घेणं देणं नाही. सरकारनं मराठ्यांच्या पोरांना उन्हात टाकायचं ठरवलं आहे. ही शेवटची लाट असेल, तुम्हाला मनात आणि मतात दोन्हीमध्येही परिवर्तन करावं लागणार", असे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला म्हणाले.