बार्शीत मराठा समाज करणार मनोज जरांगेंविरोधात आंदोलन; नेमकं काय कारण? आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 11:21 AM2024-09-09T11:21:57+5:302024-09-09T11:22:49+5:30

कळत-नकळत जरांगे यांच्या आंदोलनातून महाविकास आघाडीला फायदा पोहचवण्याचं काम होतंय, जे ३१ खासदार निवडून आले त्यांच्यावर एकही शब्द जरांगे बोलत नाहीत असा आरोप बार्शीतील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केला आहे.

Maratha community will protest against Manoj Jarange patil in Barshi, Solapur; What exactly is the reason? Know About | बार्शीत मराठा समाज करणार मनोज जरांगेंविरोधात आंदोलन; नेमकं काय कारण? आलं समोर

बार्शीत मराठा समाज करणार मनोज जरांगेंविरोधात आंदोलन; नेमकं काय कारण? आलं समोर

सोलापूर - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सातत्याने उपोषण आंदोलन करून मनोज जरांगे पाटील राज्यभरात चर्चेत आले. त्यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठ्यांना १० टक्के स्वतंत्र आरक्षण मंजूर केले. मात्र ओबीसीतूनच आरक्षण हवं ही मागणी जरांगेंनी कायम ठेवली.  मात्र आता सोलापूरातील बार्शी इथं मराठा समाजाकडूनच मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

मराठा समाजाचे स्थानिक नेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात जरांगे पाटलांविरोधात १ दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांना विचारलेल्या १० प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने शिंदे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अण्णासाहेब शिंदे म्हणाले की, तुम्ही आमचे नेते आहात, आम्ही तुम्हाला काही शंका विचारली त्यावर तुम्ही राजेंद्र राऊत, देवेंद्र फडणवीसांवर बोलले परंतु आम्ही काय विचारतोय त्यावर उत्तर दिले नाही. तुम्हाला समाजाने काही शंका विचारायची नाही का?, समाजाने तुम्हाला काय प्रश्न विचारायचे नाहीत का? समाजातून काही प्रश्न आले, ते आम्ही विचारल्यावर तुम्ही उत्तर न देता त्यात राजकारण का घातलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच मी विचारलेल्या प्रश्नावर माझ्या शंकेचे निरसन तुम्ही करायला हवे होते. मला समाजाचं काम करायचंय, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मराठा म्हणून जरांगेंना भेटायला गेले. त्यात काही गावचे सरपंच, पंचायत समितीचे माजी सदस्य, अनेक महिलांचे पैसे खाणारे, मनोज जरांगेंच्या नावाखाली पैसे घेतले असे लोक गेले होते. मात्र यांचा समाजाशी काही संबंध नाही. मूळ मुद्दा विषय जरांगेंनी बाजूला केले. आम्ही १० शंका विचारल्या त्यावर तुम्ही उत्तर द्यायला हवं होतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही महायुतीला मतदान केले नाही, महाविकास आघाडीला मते दिली. मग ३१ खासदार ज्या पक्षाचे निवडून गेलेत तुम्ही त्यांच्यावर एक शब्दही का बोलत नाही? तुम्ही तुमचा पक्ष काढा मरेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू असं अण्णासाहेब शिंदे यांनी म्हटलं.

दरम्यान, बार्शीत येऊन उत्तरे द्या असं मी जरांगेंना म्हटलं का? तुम्हाला मराठाविरुद्ध मराठा दंगली घडवायच्या आहेत का? तुम्ही बार्शीत येताय, बार्शी तालुक्यात तुम्हाला मराठा समाजाचा आमदार ठेवायचा नाही का? उद्योगधंदे करणाऱ्या पोरांच्या हातात तुम्ही कटोरा देणार का? या पोरांची जबाबदारी जरांगेंनी घ्यावी मग बार्शीत यावे. १९९४ साली शरद पवारांनी मराठ्यांचे किती वाटोळे केले हे तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तरीपण तुम्ही त्यांना फायदा पोहचवताय. कळत-नकळत आपला महाविकास आघाडीला फायदा होतोय. तुमच्या धोंगडी बैठकीमुळे जातीजातीत तेढ निर्माण व्हायला लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे काही तरूण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत. जरांगेविरोधात कुणी बोललं तर सर्व स्तरावर त्याला दडपण्याचा प्रयत्न केला जातो असंही अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले. 

Web Title: Maratha community will protest against Manoj Jarange patil in Barshi, Solapur; What exactly is the reason? Know About

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.