राज्यात मराठा-धनगर समाज एकत्र; भविष्यात सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 05:41 PM2023-10-24T17:41:46+5:302023-10-24T17:42:24+5:30
सामान्य धनगर बांधवांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. माझी सर्व धनगर समाजाला विनंती आहे मतभेद विसरून एकत्र या असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केले.
अहमदनगर – जालना येथील पोलीस लाठीचार्जनंतर मराठा आंदोलन पेटलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यात धनगर समाजानेही त्यांच्या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी चौंडी येथं मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यामुळे भविष्यात मराठा-धनगर समाज एकत्र आल्यानं राज्य सरकारसमोर मोठं संकटं उभं राहण्याची शक्यता आहे.
चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हा लढा सामान्य धनगर आणि सामान्य मराठा बांधवांचा आहे. धनगर समाजाने मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे आमचेही कर्तव्य आहे. सामान्य मराठा घराघरातून रस्त्यावर उतरला तसाच धनगर बांधवानेही स्वत:चे मतभेद सोडून, राजकारण सोडत लेकरांसाठी एकत्र यावेत. भविष्यात दोन्ही समाज शंभर टक्के एकत्र येतील. जर समाज एकटवटला नाही तर मराठा असो धनगर कुणालाही न्याय मिळणे कठीण आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच सामान्य धनगर बांधवांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. माझी सर्व धनगर समाजाला विनंती आहे मतभेद विसरून एकत्र या. फक्त मतभेद सोडावेच लागतील. मी राजकीय व्यासपीठावर जात नाही. हे सामाजिक व्यासपीठ आहे. सरकारने प्रत्येकाला वेळ द्यायचा आणि वेळ मारून घ्यायचे हे धोरण स्वीकारले. आता आम्हाला एकत्र विचार करण्याची गरज आहे. हा वर्षानुवर्षाचा लढा आहे. भविष्यात काय होईल याचा विचार सरकारने करणे गरजेचं आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, जर या दोन जाती एकत्र झाल्या तर सरकारला २ तासही आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. आमच्या दोन्ही समाजाचे दु:ख सारखे आहे. भविष्यात काहीही होऊ शकते. एकत्र येऊ शकतो, एकत्रित लढाई करू शकतो. आमच्या लेकरांसाठी लढू शकतो. आमचा कुणीही मालक नाही. धनगर बांधवांनी घराघरातून बाहेर पडून एकत्र आले पाहिजे असंही मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केले.
शिवशाही-होळकरशाही एकत्र येऊ
मराठा समाजाचा संघर्षयोद्धा धनगर समाजाच्या संघर्षात साथ द्यायला आला आहे. आम्ही धनगर बांधवांच्या वतीने त्यांचे स्वागत करू. धनगर आरक्षणाची चळवळ हातात हात घालून पुढे लढाई. या देशात ज्या क्रांती झाली. जिथे यश मिळाले, तिथे होळकरशाही आणि शिवशाही एकत्र येऊन यश मिळाली, आरक्षणाविरोधातील हुकुमशाही मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.