मुंबईच्या वेशीवर ठाण्यात मराठा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 05:39 AM2016-10-17T05:39:45+5:302016-10-17T05:39:45+5:30

सकल मराठा समाजाच्या क्रांती मूकमोर्चाने आज मुंबईच्या वेशीवर, ठाण्यात जोरदार धडक दिली.

Maratha Elgar in Thane on Mumbai's Gateway | मुंबईच्या वेशीवर ठाण्यात मराठा एल्गार

मुंबईच्या वेशीवर ठाण्यात मराठा एल्गार

Next


ठाणे : सकल मराठा समाजाच्या क्रांती मूकमोर्चाने आज मुंबईच्या वेशीवर, ठाण्यात जोरदार धडक दिली. रविवारी निघालेल्या या अभूतपूर्व मोर्चांने गर्दीचा उच्चांक गाठलाच; शिवाय, सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शनही घडविले. मुस्लिम समाजासह इतर समाज बांधवही या मोर्चात सहभागी झाले होते.
या मोर्चासाठी उसळलेल्या जनसागरामुळे संपूर्ण ठाणेनगरी भगवी झाली होती. आबालवृद्धांसह महिलांची लक्षणीय संख्या हे त्याचे खास वैशिष्ट्य होते. खासगी वाहनांमुळे कोंडी होऊ नये, यासाठी रेल्वेच्या ४० अतिरिक्त लोकल सोडण्यात आल्या होत्या. तसेच मेगाब्लॉकही रद्द करण्यात आला होता. शिवाय, वाहतुकीसाठी शहरातील प्रमुख रस्ते आठ तासांसाठी बंद ठेवण्यात आले.
मराठा क्रांती मूक मोर्चा रविवारी तीनहातनाक्यापासून निघणार म्हणून सकाळपासूनच तेथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तीनहात नाक्यावर जिजाऊंना मानवंदना देऊन ११ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या पहिल्या टप्प्यात लहान मुले, मुली, त्यामागे महिला, ज्येष्ठ नागरिक; डॉक्टर, वकील, इंजिनीअर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्ती, मराठा समाजाचा जनसमुदाय, सरतेशेवटी राजकीय मंडळी आणि त्यांच्या मागे स्वच्छता निरीक्षक अशा शिस्तीत हा जनसमुुदाय मार्गक्रमणा करत होता. (प्रतिनिधी)
मुंबईच्या वेशीवर ठाण्यात रविवारी तीनहात नाक्यावर जिजाऊंना मानवंदना देऊन सकाळी ११ वाजता मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात झाली. शिस्तीत मार्गक्रमण करत हा लाखोंचा जनसमुुदाय दुपारी पाऊणच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. या मराठा क्रांती मूक मोर्चाला मुस्लिम, जैन, मारवाडी, गुजराती, गुजर, कोळी, आगरी, कुणबी अशा विविध समाजांनी पाठिंबा दिला होता. तेही या ऐतिहासिक मोर्चात सहभागी झाले होते.
>सर्वपक्षीय नेतेही सहभागी
या मोर्चात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, जितेंद्र आव्हाड, निरंजन डावखरे, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, प्रमोद हिंदुराव, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय मंडळीही या मोर्चात सहभागी झाली होती.
>इतर समाजांचाही पाठिंबा
या मोर्चावर ड्रोनद्वारे करडी नजर ठेवण्यात आली. प्रत्येक क्षण टिपला गेला. मराठा क्रांती मूक मोर्चाला मुस्लिम, जैन, मारवाडी, गुजराती, गुजर, कोळी, आगरी, कुणबी अशा विविध समाजांनी पाठिंबा दिला होता. तेही या ऐतिहासिक मोर्चात सहभागी झाले होते.
दुपारी पाऊणच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. या मोर्चाचे नेतृत्व मुलींनी केले आणि मोर्चासमोर आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही त्यांनीच दिले.
>मराठा तरुणांसाठी ‘बार्टी’च्या धर्तीवर संस्था
मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय न्यायालयावर सोपवून, या समाजातील युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या धर्तीवर संस्था स्थापन करण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केली असून,लवकरच या संस्थेची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते. आज स्पर्धा परीक्षेपासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंत अनेक ठिकाणी मराठा समाजातील तरुणांना अडचणींना तोंड द्यावे लागते. - वृत्त/१०

Web Title: Maratha Elgar in Thane on Mumbai's Gateway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.