'९ ऑगस्टच्या आंदोलनात सामील व्हा, अन्यथा काळं फासू'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 09:23 PM2018-08-04T21:23:32+5:302018-08-04T21:27:10+5:30
मराठा क्रांती मोर्चाचा समाजातील लोकप्रतिनिधींना इशारा
लातूर : 9 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा, अन्यथा तोंडाला काळं फासू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं समाजातील आमदार, खासदारांना देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना इशारा देण्यात आला आहे.
लातूरमध्ये सलग चौथ्या दिवशी मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी पावणे अकराच्या सुमारास जोरदार घोषणा देत घंटानाद करीत आंदोलनास सुरूवात झाली. तत्पूर्वी सुमित सावळसुरे व नवनाथ माने यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार विक्रम काळे हे उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. आरक्षणासाठी तरुण आत्महत्या करत आहेत. मात्र तरीही मराठा समाजातील लोकप्रतिनिधी गप्प आहेत. आरक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती त्यांच्याकडे नाही. हे आंदोलन त्यांचं नाही का ? असा सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
क्रांती दिनी होणारं आंदोलन शासनाच्या उरात धडकी भरवणारं करण्याचा व त्यासाठी गावागावात, वाड्या-वस्त्यांत संदेश पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आमदार विक्रम काळे यांचे वडिल दिवंगत वसंतराव काळे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी शेतकरी व ग्रामविकासात दिलेल्या योगदानाचा उल्लेख आंदोलनाकर्त्यांकडून करण्यात आला. आमदार काळे यांनी वडिलांचा हा वारसा पुढे न्यावा, असा सल्लाही आंदोलनकर्त्यांनी दिला. ही लढाई आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.