Maratha Kranti Morcha: फडणवीस सरकार आलं अन् मराठा आरक्षण कोर्टात गेलं: नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 03:28 PM2018-07-27T15:28:11+5:302018-07-27T15:41:26+5:30
Marartha Reservation: काँग्रेस सरकारच्या काळात मराठ्यांना आरक्षण लागू झालं होतं.
मुंबईः काँग्रेस सरकारच्या काळात मराठ्यांना आरक्षण लागू झालं होतं. विद्यार्थ्यांना आरक्षणातून महाविद्यालयात प्रवेशही मिळत होता. परंतु फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर आरक्षण बंद करण्यात आलं, असं नारायण राणे म्हणाले आहे. राणे समितीनं आरक्षणाबाबतच्या सर्व अडचणी दूर केल्या होत्या. त्यामुळेच काँग्रेसच्या काळात आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली होती. सरकार बदलल्यानंतर काही अडचणी आल्या आणि कोर्टाकडून हे आरक्षण रद्द करण्यात आले. सरकारने आरक्षणासंदर्भात चुका काढून मराठा समाजाची दिशाभूल करू नये. सर्वतोपरी प्रयत्न करून न्यायालयात योग्य कागदपत्रे सादर करून मराठ्यांना आरक्षण द्यावं, असेही राणे म्हणाले आहेत.
तामिळनाडूच्या धर्तीवर कलम 16 आणि 17 प्रमाणे आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील मराठे तरुण पोलिसांचा मार खातायत हे मला पाहवत नव्हतं. जाळपोळ आणि तोडफोडीमुळे राज्याचं नुकसान होत आहे. मुख्यमंत्री तातडीनं आरक्षण देऊ शकतात. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी मध्यस्थी करत आहे. सामाजिक, शैक्षणिक मागसलेपणाचा सर्व्हे करून आरक्षण राणे समितीनं दिलं होतं. आंदोलकांनी तुटेपर्यंत दोरी खेचू नये. सरकार आरक्षण द्यायला सक्षम आहे. आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार आहे. महाराष्ट्रातील हिंसाचार रोखण्याचा मी प्रयत्न करत आहे. हिंसक आंदोलन थांबावं ही सरकारची इच्छा आहे.