मराठा क्रांती मोर्चाचा २७ आॅक्टोबरला मंत्रालयाला दुचाकी, चारचाकींनी घेराव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 06:28 AM2018-10-14T06:28:55+5:302018-10-14T06:29:19+5:30
मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदनंतर राज्यभरात मराठा समाजाच्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदनंतर राज्यभरात मराठा समाजाच्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील शेकडो गुन्हे खोटे असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने हे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा २७ आॅक्टोबरला मंत्रालयाला दुचाकी आणि चार चाकींचा घेराव घालण्याचा इशारा संघटनेच्या समन्वयकांनी मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, बंददरम्यान कोणतीही हिंसा केली नसतानाही, पोलिसांनी सरसकट गुन्हे दाखल केले आहेत. डॉक्टर, वकील आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांवर दाखल झालेल्या या गुन्ह्यांमुळे एका पिढीचे आयुष्य वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे हे गुन्हे रद्द झाले नाही, तर भविष्यातील आंदोलनात हेच तरुण हिंसेचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही क्रांती मोर्चाने दिला आहे.
मराठ्यांना आरक्षण न देणाऱया सरकारने किमान मराठा समाजातील तरुणांना तरी गुन्हेगार होण्यास भाग पाडू नये, असे आवाहनही संघटनेने केले आहे. आतापर्यंत अशा प्रकारचे साडेतीन हजार गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार संबंधित गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अन्यथा २७ आॅक्टोबरला हजारो दुचाकी आणि चार चाकी गाड्या मंत्रालयाला घेराव घालतील, असा इशारा समन्वयकांनी दिला.