मराठा क्रांती मोर्चाची नवी मुंबईत बैठक, आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत; व्यूहरचनेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 03:40 AM2017-12-22T03:40:54+5:302017-12-22T03:41:48+5:30
गुजरातमधील पिछेहाटीनंतर भाजपा सरकारवर दबावतंत्र वापरण्यासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने २५ डिसेंबरला पनवेलच्या व्ही.के. हायस्कूलमध्ये राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे.
मुंबई : गुजरातमधील पिछेहाटीनंतर भाजपा सरकारवर दबावतंत्र वापरण्यासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने २५ डिसेंबरला पनवेलच्या व्ही.के. हायस्कूलमध्ये राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे.
मुंबई महामोर्चावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी कोणत्याही निर्णयावर प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात झालेली नसल्याचा आरोप समन्वयकांनी केला आहे. परिणामी, सरकारला धारेवर धरण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याची चर्चा समाजामध्ये सुरू आहे. याच वेळेचा फायदा घेऊन मराठा क्रांती मोर्चाकडून तातडीने बैठकांचे आयोजन सुरू झाले आहे.
नवी मुंबईतील बैठकीत राज्यभरातील समन्वयक उपस्थित राहतील, असा दावा विनोद साबळे यांनी केला आहे. साबळे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीत सांगितले की, ९ आॅगस्ट २०१७ रोजी काढलेल्या महामोर्चातील किती आश्वासनांचे शासन निर्णय निघाले आणि इतर आश्वासनांची सद्य:स्थिती काय आहे, याचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. त्यानंतर सर्व समन्वयक चर्चेने पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील.
एकंदरीतच पाटीदार समाजाने दिलेल्या झटक्यानंतर मराठा समाजानेही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दबाव गट निर्माण करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. विशेषत: पुढील अधिवेशनापर्यंत ठोस निर्णय हाती पाडण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून मोठ्या आंदोलनाची घोषणा होण्याची शक्यताही एका समन्वयकाने व्यक्त केली आहे.