मराठा क्रांती मोर्चा : व्यथा मांडण्यासाठी माता-भगिनी मुंबई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:32 AM2017-08-10T04:32:28+5:302017-08-10T04:32:39+5:30
मुलीला बारावीत ८० टक्के गुण मिळूनही अपेक्षित अभ्यासक्रमाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. उच्चशिक्षित असूनही आरक्षणामुळे मुलगा सरकारी नोकरीपासून वंचित आहे, अशा व्यथा सांगणाऱ्या हजारो मातांनी आझाद मैदानात उपस्थिती लावून मराठा आरक्षणाची मागणी केली.
सागर नेवरेकर
मुंबई : मुलीला बारावीत ८० टक्के गुण मिळूनही अपेक्षित अभ्यासक्रमाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. उच्चशिक्षित असूनही आरक्षणामुळे मुलगा सरकारी नोकरीपासून वंचित आहे, अशा व्यथा सांगणाºया हजारो मातांनी आझाद मैदानात उपस्थिती लावून मराठा आरक्षणाची मागणी केली. राज्यभरातून मुंबईत आलेल्या महिलांनी ‘एक मराठा, लाख मराठा’चा नारा दिला.
आझाद मैदानात पहाटेपासून मोर्चेकºयांनी गर्दी केली होती. त्यात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. विशेषत: कोल्हापूर, बीड, सांगली, सातारा जिल्ह्यातून आपल्या कुटुंबीयांसोबतच मोर्चात सामील होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला होता. भायखळा परिसरातून निघालेल्या मोर्चातही महिलांनी शिस्तबद्ध पद्धतीने वाटचाल करीत स्वयंसेवकांचीही भूमिका पार पाडली.
काही महिलांनी लहानग्यांना कमरेवर घेऊन आझाद मैदान गाठले. चिपळूण येथील रेणुका राजेशिर्के यांना गुडघ्याचा त्रास असूनही त्या पुढच्या पिढीसाठी मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, वर्षानुवर्षे मराठा समाजाकडे यंत्रणांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता भावी पिढीसाठी पुढाकार घेऊन मोर्चाच्या माध्यमातून संघर्ष करण्याचे ठरविले. त्यामुळे चिपळूणमध्येही महिलांना मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.
चिमुरडीच्या घोषणेवर टाळ्यांचा कडकडाट
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून आलेल्या ईशान्वी देशमुख या तीन वर्षांच्या चिमुरडीने मोर्चाच्या सुरुवातीलाच आंदोलकांमध्ये उत्साह निर्माण केला. अफलातून भाषण कौशल्य असलेल्या या आंदोलकाने, ‘मराठा समाजाला आरक्षण द्या’, ‘महिलांंवर अन्याय होऊ देऊ नका’, ‘आमचे संरक्षण करा’ या मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले. ‘तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय!’ या तिच्या घोषणेवर तर टाळ्यांचा कडकडाट झाला.
कोपर्डीतील ग्रामस्थही सहभागी
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील सुमारे चारशेहून अधिक ग्रामस्थही मोर्चात सहभागी झाले होते. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिच्या मदतीसाठी सारा गाव धावून गेला. ज्यांनी पीडित कुटुंबीयांना मदत केली पोलिसांनी त्यांच्यावरच अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले व दोन महिने तुरुंगात डांबून ठेवले, असे कोपर्डीचे सरपंच सतीश सुद्रिक यांनी सांगितले. ते म्हणाले, चौकशीनंतर तक्रारीत तथ्य नसल्याचे लक्षात आल्यावर आम्हाला सोडून दिले. आम्ही दोन महिने कारागृहात खितपत पडलो त्याचे काय? अशी विचारणा संतप्त ग्रामस्थांनी केली. मराठा समाजाची ही अवहेलना आम्ही अजून किती दिवस खपवून घेणार, असा सवाल त्यांनी केला.