मराठा क्रांती मोर्चा राजकीय आखाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 05:47 AM2016-11-16T05:47:59+5:302016-11-16T05:45:41+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने आता राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. राज्यातील सर्व राजकीय
चेतन ननावरे / मुंबई
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने आता राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा आगामी निवडणुकांत संबंधित राजकीय पक्षांचे पानिपत करू, असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात विविध २६५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात मराठा समाजाची मते मोठ्या संख्येने आहेत. काही पक्षांकडून छुप्या पद्धतीने मराठा क्रांती मूक मोर्चाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे उघडपणे या मोर्चांना आणि मोर्चाच्या मागण्यांना कोणत्या पक्षांचा पाठिंबा आहे, हे जाणून घेण्याचा निश्चय मराठा क्रांती मूक मोर्चाने केला आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि इतर घटक पक्षांच्या प्रमुखांना निवेदन देण्यात येणार आहे.
मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे-पाटील यांनी सांगितले की, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन केलेले आहे. त्याआधी सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका जाहीर करावी. भूमिका जाहीर करताना निवेदनात दिलेल्या मागण्यांबाबत पक्षाने स्पष्टता ठेवण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.