Maratha Kranti Morcha: बाबानो, कोणतंही आंदोलन असो...पहिला बळी माझाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 05:35 PM2018-08-08T17:35:16+5:302018-08-08T19:14:53+5:30
Maratha Kranti Morcha: एसटी महामंडळाद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांच्यामार्फत (चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक) बसस्थानकावर आणि बसेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना सविनय निवेदन देऊन बसेसची होणारी मोडतोड, जाळपोळ करणाऱ्यांना रोखण्याविषयी साकडे घातले जात आहे.
मुंबई : कोणतेही आंदोलन असो, आंदोलनातील हिंसाचारचा पहिला बळी ठरते, मी एसटीच! मराठा आंदोलनात राज्यभरात आतापर्यंत 500 हून अधिक एसटी बसेसची नासधूस केली आहे. अजूनही चालूच आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांच्यामार्फत (चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक) बसस्थानकावर आणि बसेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना सविनय निवेदन देऊन बसेसची होणारी मोडतोड, जाळपोळ करणाऱ्यांना रोखण्याविषयी साकडे घातले जात आहे.
प्रवाशी हे एसटीचे अन्नदाता आहेत. त्यांना सुरक्षित व सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी एसटीची आहे. परंतु आंदोलनातून होणाऱ्या हिंसाचारात बसेसबरोबर त्यातील प्रवाश्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे प्रवाशाच्या माध्यमातून एसटीचे कर्मचारी आंदोलकांनाच विनम्र आवाहन करीत आहेत की, एसटी तुमचीच आहे. तिची मोडतोड व जाळपोळ करून नुकसान करू नका. त्याचबरोबर, दररोज ६७ लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवासी सेवा देणारी एसटी बंद झाली तर सर्वसामान्य जनतेचीच गैरसोय होणार आहे. प्रत्येक बसस्थान, बसेस मधून प्रवास करणा-या सर्वसामान्य जनतेला एसटीच्या सुरक्षिततेसाठी साकडे घालणयाचे अभियान आजपासून सुरु झाले आहे.
मुंबई सेंट्रल आगारात आज प्रवाशांना माहिती पत्रके वाटण्यात आली. या वेळी आगार व्यवस्थापक (वरिष्ठ )सुनील पवार, सहायक वाहतूक अधीक्षक गीता कोंडार , प्रभारक श्रीरंग बरगे, सहायक वाहतूक निरीक्षक सतीश लीपारे आणि कर्मचारी हजर होते.