Maratha Kranti Morcha : औरंगाबादेतील दुर्दैवी घटनेस प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत – जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 10:15 PM2018-07-23T22:15:13+5:302018-07-23T22:19:32+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील अागर कांनडगाव इथे काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात जलसमाधी घेतली.

Maratha Kranti Morcha: Unfortunate incidents of Aurangabad police inaction and incompetence due to incompetence - Jayant Patil | Maratha Kranti Morcha : औरंगाबादेतील दुर्दैवी घटनेस प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत – जयंत पाटील 

Maratha Kranti Morcha : औरंगाबादेतील दुर्दैवी घटनेस प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत – जयंत पाटील 

Next

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील अागर कांनडगाव इथे काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात जलसमाधी घेतली. आषाढी एकादशीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेस पोलिस व प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा जबाबदार आहे, आंदोलनकर्त्या तरुणांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने काकासाहेब शिंदे या आंदोलकाचा बळी घेतला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. याआधी मराठा समाजाने शांतपणे लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले, इतके दिवस उलटूनही सरकारने अद्यापही मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. मराठा क्रांती मोर्चामधील तरूणांनी निवेदन दिले असताना आणि अशी घटना घडू शकते याबाबतची माहिती असतानाही प्रशासनाने कोणतीही आवश्यक खबरदारी घेतली नाही वा घटना रोखण्यासाठी पावले उचलली नाहीत, त्यामुळे प्रशासनाची दिरंगाईच यासाठी कारणीभूत असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. 

या सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या, मुस्लिम आणि लिंगायत समाजाचे आरक्षण प्रलंबित आहे. ओबीसी समाजातील सर्व घटकांना सरकारने फसवी आश्वासने दिली, आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. दलित समाजातही असंतोष आहे. आरक्षणाबाबत पुनर्विचार करण्याची भाषा केंद्रीय मंत्री करतात. सरकारची पलायनवादी भूमिका याला कारणीभूत आहे. त्यामुळे सर्वच समाजांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे. एवढी अशांतता, अस्थिरता याआधी महाराष्ट्राने कधी अनुभवली नव्हती, असा उद्वेग पाटील यांनी व्यक्त केला. 

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणतेही राजकारण करायचे नाही. मराठा समाजाने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करावे. आक्रमक होणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. आपल्या देशात लोकशाही आहे. तुम्ही मतांच्या माध्यमातून आपली नाराजी प्रकट करा, असे आवाहन त्यांनी आंदोलकर्त्या तरूणांना केले. तसेच सरकारने जनतेचा अंत पाहू नये, आरक्षणाबाबत त्वरित भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले.

Web Title: Maratha Kranti Morcha: Unfortunate incidents of Aurangabad police inaction and incompetence due to incompetence - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.