विधेयकाला मंजुरी मिळेपर्यंत मराठ्यांचा ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 08:31 PM2018-11-26T20:31:07+5:302018-11-26T20:31:18+5:30
संवाद यात्रेची आझाद मैदानात धडक; राज्यभर धरपकड
मुंबई : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मूक मोर्चाने दिला आहे. आरक्षणासाठी विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने राज्यात सुरू केलेल्या संवाद यात्रेचा समारोप सोमवारी आझाद मैदानात झाला. दरम्यान, मोठ्या संख्येने येणाºया मराठा कार्यकर्त्यांची राज्यभर धरपकड केल्याने आझाद मैदानात जमलेल्या कार्यकर्ते व समन्वयकांनी शासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली.
समन्वयक विरेंद्र पवार म्हणाले की, १६ नोव्हेंबरला संवाद यात्रेची सुरूवात झाली होती. शिस्तबद्धपणे सुरू असलेल्या यात्रेचा समारोप आझाद मैदानात होणार होता. तरीही सरकारने कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे अशा विविध जिल्ह्यांत कार्यकर्त्यांची अडवणूक केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. मात्र मराठा समाजाने पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आपल्या मागण्या रेटून धरल्या आहेत. संवाद यात्रेचे रुपांतर आझाद मैदानात ठिय्या आंदोलनात झाले आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.
मराठा आरक्षण मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष करणार नसल्याचे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. कोंढरे म्हणाले की, न्यायालयात टिकेल असे आरक्षण सरकारने द्यावे. आरक्षणासाठी ४०हून अधिक कार्यकर्त्यांनी जीवाचे बलिदान दिले आहे. त्यामुळे आरक्षणानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.