मराठा-कुणबी अस्मिता, अस्तित्व आणि संबंध
By Admin | Published: November 6, 2016 01:29 AM2016-11-06T01:29:31+5:302016-11-06T01:33:34+5:30
मराठा मूक मोर्चांमुळे महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. या मूक मोर्चांनंतर काही अन्य समाजबांधवांनी मूक मोर्चे काढून त्यांच्या मागण्याही रेटल्या. पुरोगामी महाराष्ट्रात मोर्चे काढले जात
- डॉ. वामन गवई
मराठा मूक मोर्चांमुळे महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. या मूक मोर्चांनंतर काही अन्य समाजबांधवांनी मूक मोर्चे काढून त्यांच्या मागण्याही रेटल्या. पुरोगामी महाराष्ट्रात मोर्चे काढले जात असले तरी सामाजिक सलोखा मात्र कायम आहे. कुठेही एकमेकांविषयी द्वेषाची भावना नाही. मराठा मोर्चांमध्ये कुणबी समाजाचा प्राधान्याने उल्लेख झाला. प्रत्यक्षात कुणबी - मराठा समाजाची शास्त्रोक्तरीत्या पार्श्वभूमी तपासल्यास हे एकाच कुळातील असल्याचे पुरावे आढळल्याचा वैचारिक परामर्श घेणारा हा लेख. आणि त्यासोबतच अॅट्रॉसिटी कायदा बदलत्या काळातही हवा असल्याचे मुद्देसूद समर्थन करणारा लेख.
कुणबी-मराठा ही महाराष्ट्रातील तुलनात्मकरीत्या सर्वात मोठी जात आहे. कुणबी समाज इतिहास पुरुष असून, महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. सामाजिक पुनर्रचनेच्या समता आंदोलनाचा अग्रदूत, स्वातंत्र्य आंदोलनाचा कणा, अर्थ उद्योगाचा/सहकाराचा अग्रणी आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्राचा राजकीय सत्तेचा शक्ती स्रोत आहे. वर्तमान काळात मराठा मोर्चाच्या माध्यमातून हा समाज पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. न्याय्य मागणी म्हणून एका विशिष्ट अजेंड्याखाली शहरोशहरी लाखोंचे मोर्चे निघत आहेत.
मराठ्यांना आरक्षण मिळावे आणि सरकारी सवलती त्यांना मिळाव्या या महत्त्वाच्या मागण्यांसोबतच पोटजातीचा (?) क्षत्रिय-क्षेत्रिय कुणबी-मराठा एकच की वेगळे, हाही वाद चर्चेचा विषय राहिला आहे. मराठा या नावासोबतच क्षत्रिय हा वर्ण विषयक शब्द जोडला गेल्याने, अथवा क्षत्रिय या शब्दाने मोहीत केल्याने मराठा स्वत:ला क्षत्रिय समजतात. कुणबी (कुळवाडी) हा शब्द कुणबिक करणारे शेती करणारे या अर्थाने येतो, परंतु मराठा-कुणबी हा आहेत की भिन्न आहेत? याविषयी मागील शंभर वर्षांत चर्चा झाली. ती याच वर्तमान परिस्थिती झाली असे नाही, परंतु वर्तमान सामाजिक वातावरणाचा विचार करता, मराठा समाज हा आरक्षणाची मागणी करत आहे, तर कुणबी म्हणविणारा समाज इतर मागासवर्गीय जातीचे फायदे आधीपासून घेत आहे.
एरव्ही स्वत:ला मराठा म्हणविणारा समाज हा सवलतीच्या वेळी स्वत:ला कुणबी म्हणवितो. महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्टिकोनातून मराठा-कुणबी समूह इतिहासाचे स्वतंत्र दृष्टिकोनातून अध्ययनपर संक्षिप्त चिंतन व्हावे, हा हेतू समोर ठेवून प्रस्थापित कुणबी-मराठ्यांच्या राजपूत उद्भवाच्या सिद्धांताची संक्षिप्त तपासणी करून कुणबी-मराठ्याच्या अस्तित्वाची पाळेमुळे शोधता येतील का, कुणबी आणि मराठी द्वि अस्मितादर्शी संकल्पना मानववंशशास्त्राच्या वास्तववादी दृष्टिकोनातून तपासण्याचा प्रयत्न, हे या लेखाचे प्रयोजन आहे.
गण समाज आणि कुणबी-मराठा याचा आढावा घ्यायचा झाल्यास, सहा बैलाच्या नांगराने दिवसभर नांगरल्या जाणाऱ्या शेतीला कुल म्हणत. मातृसत्ताक पद्धतीत जमीन ही खासगी मालकीची नव्हती, तर ती कुळाच्या मालकीची होती. शेतीचा शोध लावणारी स्त्री कुलमाता होती. प्रत्येक कुल हे आपली उत्पत्ती देवता, वृक्ष, प्राणी यापासून झाली असे समजत. ज्यापासून उत्पत्ती ते त्या कुलाचे पवित्र कुलचिन्ह मानले जाई. त्या कुल चिन्हावरून त्या मातृसत्ताक आर्येतर समाजाची आडनावे पडली, असे डी. डी. कोसंबी यांचे मत आहे. अनेक कुलाचा पक्ष. कुलार्ध (मोईटी) अनेक कुलार्धाचा गण. कृषीशी संबंधित असणाऱ्या आर्येतर हे मातृसत्ताक कुलाचे आहेत.
कुल जमिनीच्या सामूहिक मालकी असणाऱ्या घटकाला, क्षेत्रीय (क्षेत्राचा मालक) जमीन उत्पादन क्षमता असणारी स्त्री एक क्षेत्र समजली जाई. क्षेत्राची मालकी असणारा क्षेत्रीय, क्षेत्रपती अर्थात, हा क्षेत्रीय चातुवर्ण व्यवस्थेतील क्षत्रिय नव्हे. प्राचीन मातृसत्ताक गण समाजात दोनच वर्ण होते. एक क्षेत्रीय व दुसरा दास. गणासाठी श्रम करणारा व देवराज चनानानी प्राचीन भारतातील दास या ग्रंथात दासांचे आठ प्रकार सांगितलेले आहे. भारतीय गण समाजातील लोक क्षेत्राचे, सामूहिक मालक होते आणि गणाचे निर्णय गणसभेच्या बैठकीत बहुमताने घेतले जात. गणाचा प्रमुख राजा, खत्रीय-क्षेत्रीय निवडत असत. राजा गण सदस्यांच्या बहुमताच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत असे. कधी-कधी दोन व अधिक गण एकत्र येत संघगण बनवित असत. जमीन जशी क्षत्रिय गणसदस्य जनतेची होती, तशीच राजाच्या खासगी मालकीचीसुद्धा होती. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात जनतेच्या जमिनीला राष्ट्र असे म्हटले आहे. कोसंबीने राष्ट्राच्या अर्थ गणाची जमीन किंवा गणाच्या सामूहिक मालकीची जमीन, राजाच्या खासगी मालकीच्या जमिनीला सीता म्हणत, असे निरीक्षक नोंदविले आहे.
गण हा ज्ञातीपासून बनलेला असे आणि ज्ञातीमध्ये अनेक कुले असत. शदर पाटील (मा.फु.आं.पृ. १२) म्हणतात की, गण भूमीचे प्रथम तिच्या घटक ज्ञातींमध्ये वाटप होईल आणि नंतर ज्ञाती आपली जमीन आपल्या कुलामध्ये वाटप करीत. वैयाकरण कात्यायन सांगतो की, कुलांचा समूह म्हणजे गण. गण हा शब्द ज्ञाती वाचकही आहे. कारण शंकराचार्य बृहदारण्यक उपनिषदात म्हणतात की, वीश वा गण सदस्य हे एकट्याने अर्थाजन करू शकत नाहीत, ज्ञाती संघटनेद्वारेच क रू शकतात. म्हणून गाणपत्याचा अर्थ ज्ञातिजन असाही होतो. गाणपत्यांचा समुदाय हा मातृसत्ताकवादी होता, असे देविप्रसाद चट्टोपाध्याय प्रतिपादन करतात. ज्ञातींचा अर्थ, अमर कोसाने (२.११४२ नुसार) सातव्या पूर्वी पिढीपर्यंतचा नातेवाईक असा दिला आहे. जो माणूस आठव्या पिढीतील वा त्या पलीकडच्या पिढीतील नातेवाईक असेल, तो ज्ञाती ठरू शकत नसे. (दासशुद्रांची गुलामी खंड १ पृ. २५) शरद पाटील म्हणतात की, एका वर्गातील कुलांच्या समूहापासून ज्ञाती नावाच्या संघटना बनत. पुढे ते म्हणतात की, मानव समाजाने प्रत्येक ठिकाणी वाटचालीची सुरुवात झुंड वा कळप या संघटनेने केली. ऋग्वेदतील इंद्र आणि इंद्रायणीच्या (१०.८६.२-६) संवादावरून झुंडीला समन हा मूळ वैदिक शब्द असावा. पाणिनीच्या अष्ठाध्यायीच्या ४.४.४३ सुत्तावरून समाज व समच्या हे पर्यायवादी शब्द असावेत. पाणिनी सूत्र समाज दुभंगून गणार्ध नावाचे घटक जन्माला आले आणि गणार्धासाठी वर्ग व पक्ष हे शब्द वापरले जात. पक्षाच्या अर्थ अर्ध असा होतो. वर्ग हा असकुल-संयोगी असतो, म्हणजे एकाच वर्गातल्या नाही, तर वेगवेगळ्या वर्गामधल्या स्त्री व पुरुषांचा होऊ शकतो. वर्गाच्या दुभंगण्यातून नंतर कुल नावाचे घटक अस्तित्वात आले. (शरद पाटील दास शुद्राची गुलामी खंड १ पृ. २३) कुणबी आणि मराठा (?) हे शेती करणारे अत्यंत प्राचीन गण समाजाचे घटक आहे हे सर्वमान्य होईल.
कुणबी व्याख्या व अन्वयार्थ :
कुणबी म्हणजे कुटुंबीन. कुटुंबीन शब्द अर्थशास्त्रात (ख्रि. पूर्व ४०० ते ३०० दरम्यान) प्रथम येतो. बौद्ध काळात गहपती, कुटुंबीन कृषिकर्म आणि व्यापार करणारे शूद्र शेतकरी आणि ब्राह्मणही आढळतात. तथापि, कुवारी जमीन जंगलातून काढून वहितीखाली आणण्यासाठी ब्राह्मण ग्राम वसवित, पण ते ब्राह्मण असल्यामुळे ते शेती दासांकरवी करवित असत. सुत्तपिटके संयुवनिकायपालि (१ सगाथ वग्गो) जगदिस कस्सोपो पृ. १७१ कार्स (कृषी) भारद्वाज सुत्तावरून दिसते, मुळात शेती प्रत्यक्ष करणारा कुणबी हाच बुद्ध आणि बुद्धपूर्व काळापासून दिसून येतो. ब्राह्मण गृहपती सोडले, तर ब्राह्मणेत्तर गहपती हे आजच्या बनिया, भांडवलदार जात वर्गाचे वरचढ शेतकरी जातवर्गाचे आद्यपूर्वज आहेत. कुणबी-मराठा समाज ऐतिहासिक काळापासून भारताचा वंश घटक असावा, तो क्षत्रिय क्षेत्राचा (भूमीचा) मालक राहत आला असून, बौद्ध काळात गहपती, गृहपती म्हणून कृषक कार्यातील महत्त्वाचा घटक होता. त्याचा क्षेत्रापांशी वांशिक संबंध असावा. मराठा-कुणबी राजपूत वंशाचा नसून, वांशिक आणि सांस्कृतिक अस्तित्व स्वतंत्र असावे.
कुणबी शब्दाची उत्पत्ती यावर लक्ष केंद्रित करावयाचे झाल्यास, कुणबी या अंतर्गत येणाऱ्या लोकांचे निरीक्षण अभ्यासकांनी पुढीलप्रमाणे नोंदविले आहे. आर. व्ही. रसेल आणि हिरालाल यांनी विसाव्या शतकातील प्रारंभी लिहिलेल्या ट्राइब्ज अँड कास्ट आॅफ द सेंट्रल प्रोव्हिस आॅफ इंडिया खंड ४ पृ. १६ मध्ये कुणबी ही महाराष्ट्रातील मोठी जात असून, मुंबई इलाख्यात त्यांना कुणबी किंवा कुलंबी, डेक्कन वऱ्हाडात त्यांना कुणबी, कुलंबी म्हणतात. दक्षिण कोकणात कुळवाडी, गुजरातमध्ये कनकी, बेळगावमध्ये कुळबी म्हणतात.
कुणबी हा शब्द कृषिवाचक आहे. मनुस्मृती : ७.११ नुसार एकेका नांगराला सहा बैल याप्रमाणे दोन नांगरांनी नांगरली जाईल एवढी जमीन कुल या संज्ञेस पात्र ठरत असे. या जमिनीचा प्रमुख हा कुलपत= कुळवई, कुळवी, कुणबी म्हणविला गेला. (य. रा. दाते व चि. ग. कर्वे सुलभ विश्वकोश, भाग २ पृ. ५०३). कुल+लंबी= कुलावर म्हणजे जमिनीवर अवलंबून असलेला तो कुळंबी असाही शब्द निर्माण केला जाऊ शकतो. कृषिकार्याशी आत्यंतिक निगडित अशी ही जात आहे. मराठा-कुणबी यांच्या देवकांवरून हे मराठे जातीचे आहेत, असा निर्वाळा विश्वकोश देतो. कृषिमाय ही वेदात असून, विद्या मानली आहे. (वेदिक इंडेक्स आॅफ नेम्स अँड सब्जेक्टस ए. ए. मॅक्डोनेल अँड ए. बी. कीय, खंड २ पृ. ११५५.
स्कंद पुराण ते शुद्र को अनद अर्थात, अन्न
देनेवाला तथा गृहस्थ कहा गाया है। हेमचन्द्रकृत अभिधानचिन्तामणि मे किसानो और आश्तकारोंको कुटुम्बिन कहा गया है। बहुत संभव है की, आजकल के बिहार और उत्तर प्रदेश की कुर्मी तथा महाराष्ट्र की कुनबी जातियाँ इन्ही की वंशज है (पूर्वमध्यकालीन भारत का सामंती समाज और संस्कृती - आर. एस. शर्मा, पृ. १७). असे अनेक दाखले हे कुणबी या शब्दाच्या उत्पत्तीविषयी मिळतात. मानवाचा पहिला व्यवसाय हा शेती होता. त्यामुळे कृषिकर्म करणारे सर्व कुणबी होते. कुणबी ही भारतातील प्राचीन जमात आहे. कालांतराने आर्यांच्या आगमनानंतर ही जमात शूद्र समजली गेली.
हेमगर्भविधी : हेमगर्भविधीमध्ये सुवर्णाचा गर्र्भ बनवून क्षत्रिय वर्णात प्रवेश प्राप्त करू इच्छिणाऱ्या शूद्राला, गर्भावस्थेतील स्थितीत बसवून अग्निसंस्कार, वेदमंत्रोच्चार करून क्षत्रियत्कांक्षी शूद्राच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर क्षत्रिय म्हणून गणल्या जाई. मुळात शूद्रांना कुळ आहेत आणि आर्यांना गोत्र आहेत. गोत्र म्हणजे गोठाण. ज्या पुरोहित ब्राह्मणाने क्षत्रियत्वकांक्षी शूद्राला द्विज जन्मप्राप्ती करून दिली असेल, त्या पुरोहिताचे गोत्र हेमगर्भ उत्पन्न क्षत्रियाला दिले जाई. या विधीनुसार ब्राह्मण पुरोहितांनी सहाव्या शतकात आशियातील शक, हूण, गुर्जरांना क्षत्रियत्व प्राप्त करून दिले. मूळ प्रश्न जेव्हा शेतकरी कुणबी राजपद केवळ ब्राह्मण क्षत्रियांसाठी आरक्षित होते, ते जेव्हा शिवाजी महाराजांसारखे कुळवाडीभूषण राज्य स्थापन करू शकत नाही. क्षत्रिय असू शकत नाहीत, तेव्हा हेमगर्भ विधी करून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला गेला हा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचे आजोळ हे जाधव कुळ विदर्भात त्याच्या सग्या सोयऱ्यासह कुणबी आहेत, हे वर्तमान सत्य आहे. पूर्वीचे यादव, शिलाहारादि राजवंश आपणास क्षत्रिय म्हणवित. मराठा हे नाव लावत नसत. मोगल बादहशांच्या दक्षिणेच्या स्वाऱ्यांमध्ये ज्या लोकांनी शौर्याने त्यांना तोंड दिले. त्यांना देशवाचक मरहठ्ठे असे नाव आढळते. (मराठी लोकांची संस्कृती पृ. १०४)
यदु-पतीन-मरहट्टे : मराठी संस्कृ तीच्या काही समस्या या ग्रंथात शं. बा. जोशी ऋग्वेदातील दासराज युद्धात सहभागी असणाऱ्या यदू, तुर्वसू, अनू, द्रुह्यू, पुरु या पंचजनांसंबंधी म्हणतात की, पुरु प्रमुख हे पुरुन म्हणजे नगरात राहणारे, नागरिकतेच्या उच्च श्रेणीत जन आक्रमक आर्यांनी इंद्राच्या नेतृत्वात या पुरुंचा विध्वंस केला. या पुरुंना शतपथ ब्राह्मणात असूर आणि राक्षस म्हणून संबोधले आहे. यदू हे पुरु प्रमुख पंचजनांपैकी एक जन. वेदपूर्व काळापासूनच यांची येथे या देशात वसवणूक हे आर्येतर पत्तीजन द्रविड वर्गीय होते. जोशी यांनी मरहट्याची परंपरा या आर्येतर द्रविड वर्गीय यदुंशी नेऊन जोडली आहे. मरहट्टे-यदू यांचा जसा संबंध तसाय कन्नड-तुर्वसू यांचा संबंध असे जोशींचे म्हणणे आहे. ऋग्वेद काळीच येऊन पोहोचल्या यदू पे पत्तिजन. पत्तिजन-हट्टीजन-हट्टिकार-अटकार. यातलाच मरहट्टे हा गट पत्तिजन हे रुद्र शिवाचे उपासक होते. संस्कृत मायबोली नसलेल्या व चंद्रवंशी असलेल्या या पत्तिजन यदूंशी संबंध जोडून जोशी यांनी मरहट्टे म्हणजे मराठे हे मूळचे आर्येतर आहेत, असे सुचवले आहे.
कुणबी-मराठा रजपुत क्षत्रिय नाही: सहाव्या ते आठव्या शतकापर्यंत जातीच्या सहा लक्षणांपैकी अनुवंशिकता वगळता, बाकीची पाच लक्षणे क्रमश: जन्माला येत गेली. ६ व्या ते ८ व्या शतकापर्यंत ही लक्षणे परिणत अवस्थेला गेल्याच्या सुमारास राजपूतांचा उदय झाला. ते मुळात अभारतीय हूण शकादि गण वा जमाती. ते जाती व्यवस्थापक भारतात आले. त्यामुळे ते जाती समाजाचा भाग बनले, तरीही ते क्षत्रिय म्हणून ओळखले गेले. मुळात ६ व्या ते ८ व्या शतकात भारतात येऊन क्षत्रिय मिळविणारे राजपूत वंश शास्त्रीयदृष्ट्या कुणब्यांपेक्षा भिन्न आहेत. कारण मराठा-कुणब्यांच्या डोकीची मापे ५३२ ते ५३९ मीमीपर्यंत तर रजपूतांच्या डोकीची मापे मोठी आहेत. म्हणजे रजपूत दीर्घ मस्तक आहेत, तर मराठा-कुणबी मध्यम डोकीची आहेत. जर रजपूत क्षत्रियांपासून मराठा-कुणबी निर्माण झाला असेल, तर दोघांमधील डोकींच्या मापात फार मोठा फरक नसतो. याचाच अर्थ, रजपूत-कुणबी समान कुळाचे नसावेत.
मानववंशीय शास्त्रानुसार... : जीवशास्त्रीय मानववंशशास्त्राच्या कुणबी मराठ्यांच्या कवटीच्या मापांच्या तौलानिक अध्ययनावरून कुणबी आणि मराठा यांच्या डोक्याचा मानववंशीय अध्ययनानुसार समानता आढळते. मराठा कुणबीमधील प्रदेशानुसार विखुरलेल्या या पोटजातीतील डोक्याची मापे मध्यम कपाल आणि दीर्घ कपाल या दोन्ही गटामध्ये मराठा आणि कुणबी प्रदेश विभागणीत सारखेच दिसतात. यांच्या डोक्याची मापे तौलनिक अध्ययन करताना, मध्यम कपाल दीर्घ कपाल पृथुकपाल या प्रकाराच्या संदर्भामध्ये मानववंशास्त्रज्ञ इरावती कर्वे पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण देतात. डोक्याला लहान मोठेपणा असतो, परिमाण असते. तशी आकृती असते, आकृतीची कल्पना लांबी-रुंदीच्या सापेक्ष प्रमाणात देण्यात येते. हे प्रमाण एकाच आकड्यात देतात, त्यांने केवळ लांबीचे किंवा रुंदीचे प्रत्यक्ष न होता, केवळ लांबीच्या शेकड्यात रुंदीचे प्रमाण कळते. ही मापे कवटीची व जिवंत माणसाच्या डोक्याची निरनिराळी असतात.
कुणबी ते मराठा
आतापर्यंतच्या संदर्भावरून हे लक्षात येते की, कुणबी या शब्दाच्या उत्पत्तीमागे प्राचीन भारती गण व्यवस्था महत्त्वाची होती. शेती कारणावरूनच कुणबिकी (कुणबी) हा कर्मविषयक शब्द या समूहाची ओळख झाली. भारताचा इतिहास हा वेदप्रमाण, चातुवर्ण, संस्कृती आणि अवर्ण कृषिसंबंधित क्षेत्रिय संस्कृतीच्या क्षेत्रीयांच्या संघर्षाच्या इतिहास आहे. या दोन संस्कृतीच्या संघर्षातून वर्णाश्रीत जाती व्यवस्थेचा जन्म झाला.
अवैदिक वेद प्रामाण्य नाकारणारे बौद्ध चार्वाक संस्कृतीचा पाडव भारतातील बौद्ध धम्माच्या पराजयानंतर जातवर्ण संस्कृतीतून उच्चवर्णीय श्रेष्ठत्व वैदिक यज्ञ संस्कृतीने स्थापित केल्यानंतर, कृषी माया करणारा कुणबी कुटुंबकम, गहपती हा शूद्र ठरला. पूर्वी जो क्षेत्राचा मालक होता, तो वैदिक संस्कृतीच्या प्राबल्यात शूद्र मानला गेला. अशा शूद्रापैकी शेती करणारा कुणबी हा शूद्रच होता. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी आपेगावला कुणब्याच्या घरचे शिजलेले अन्न शूद्र म्हणून नाकारले अशी नोंद आहे.
आजही अनेकदा पुरोहित
सत्यनारायणाला कुणब्याच्या घरी शिजलेले अन्न ग्रहण करत नाही, तर शिदाआटा घरी घेऊन जातात. तथापि, कुणबी कुणब्यादी शूद्रांनी वापरलेली भांडी पुरोहित ब्राह्मण अग्निसंस्कार
करून पुन्हा वापरू शकतो.
शुद्रनाम् अनिरवासितनाम।
(पाणिनी अष्ठाध्यायी २.४.१०)
वर्णव्यवस्थेत शस्त्र धारण करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मण क्षत्रिय उच्च वर्णीयांनाच दिला आहे. तथापि, मध्य आशियातून आलेल्या सहाव्या शतकातील शक, हूण, गुर्जर इत्यादी जातींना हेमगर्भ विधी करून शूद्र वर्णातून क्षत्रिय वर्णात परिवर्तीत केल्या जात होते.
(लेखक राज्यशास्त्रासह सामाजिक घडामोडींचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)