मराठा-कुणबी बांधवांचा वर्ध्यात निःशब्द हुंकार
By admin | Published: October 23, 2016 03:39 PM2016-10-23T15:39:05+5:302016-10-23T15:39:05+5:30
हातात भगवे झेंडे घेऊन आणि शिस्तबद्ध पद्धतीनं निघालेल्या मराठी-कुणबी मूक मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, तरुण मंडळी सहभागी झाली.
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 23 - हातात भगवे झेंडे घेऊन आणि शिस्तबद्ध पद्धतीनं निघालेल्या मराठी-कुणबी मूक मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, तरुण मंडळी सहभागी झाली. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास जुने आरटीओ मैदान येथून मोर्चाला प्रारंभ झाला.
मोर्चाच्या सुरुवातीला तरुणी हातात एक मराठा लाख मराठा अशा घोषणा असलेले फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या. तसेच कोपर्डी घटनेचा निषेध आणि संवैधानिक न्याय मागण्यांना मान्यता देण्याविषयीची मागणी या मूक मोर्चातून करण्यात आली. मोर्चाच्या प्रारंभी हजारोंच्या संख्येने तरुणी आणि महिला काळे कपडे परिधान करून सहभागी होत्या. यानंतर ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि सर्वात शेवट पुढारी यात सहभागी झाले होते.
या मोर्चाची लांबी तब्बल दीड किमी होती. रखरखत्या उन्हातही मराठा-कुणबी मोर्चात सहभागी झालेल्या या मोर्चेकरांनी वर्ध्याच्या इतिहासात एक नवीन नोंद केली आहे.